जालन्यात आयसीटीचे शुक्रवारी भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:22 AM2018-05-03T01:22:41+5:302018-05-03T01:22:41+5:30
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथून जवळच असलेल्या सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, त्या नंतर मुख्यमंत्री फडणवीस एका हॉटेलमध्ये आयोजित सभेत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी आ. विलासराव खरात, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, कुलपती डॉ. रघुनाथ माशेलकर, मनोज पांगारकर, आशिष मंत्री आदींची उपस्थिती राहणार आहे.
आयसीटी ही संस्था जालन्यात आल्यानंतर या भागातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होईल असा दावा संयोजकांनी केला आहे.
ही संस्था जालन्यात यावी म्हणून सत्तेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी तसेच आयसीटीच्या जालना, औरंगाबोदतील माजी विद्यार्थी, उद्योजकांनी विशेष प्रयत्न केले. मोठ्या पाठपुराव्या नंतर ही अत्यंत प्रतिष्ठेची संस्था जालन्यात होणार असून, याचा लाभ संपूर्ण मराठवाड्यातील युवकांना होणार आहे. सध्या या संस्थेसाठी ३९७ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ही संस्था २०३ एकर परिसरात उभी राहणार असून, बारावी विज्ञान नंतर त्यात पाच वर्षाच्या एमटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.