सरकारविरोधात स्वाभिमानी संघटनेचे ‘भीक माँगो’आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:28 AM2019-07-12T00:28:47+5:302019-07-12T00:29:33+5:30
विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘भीक माँगो’ आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘भीक माँगो’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भीक मागून जमा केलेले ३४० रुपये मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्जाचे वाटप करावी, कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्ती करावी, पीकविमा कंपन्यांनी केलेल्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी शासन स्तरावर करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी हातात कटोरे घेऊन वाजत गाजत भीक मागण्यात आली. यातून मिळालेले ३४० रुपये मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. मागणी मान्य न केल्यास जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नसल्याचा इशारा युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे, प्रेमसिंग धनावत, सुभाष भोपळे, अशोक भालके, नारायण हाके, नामदेव गायकवाड, विष्णू कदम, शिवाजी हाके, शेख मुख्तार, दादाराव भांबळे, रमेश भोपळे, गणेश भोपळे, परमेश्वर चव्हाण, भगवान कन्नर, शिवाजी गायकवाड, सुभाष भालके, राहुल मोरे, भगत रेनकोत आदींनी दिला आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.