भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणातील सूत्रधार दिलीपसिंग राजपूत जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 08:04 PM2024-08-23T20:04:25+5:302024-08-23T20:05:01+5:30
जळगाव जिल्ह्यातील पळसखेडा मिराचे येथून एलसीबीने घेतले ताब्यात
- फकिरा देशमुख
भोकरदन (जि.जालना) : भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंग राजपूत याच्या मुसक्या गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या. जळगाव जिल्ह्यातील पळसखेडा मिराचे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेच्या ४७ दिवसांनंतर त्याला पकडण्यात यश आले आहे.
भोकरदन येथे सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा आरोग्य विभाग व पोलिसांनी ७ जुलै रोजी संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला होता. कारवाईवेळी मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंग राजपूत हा इमारतीवरून उडी मारून पळून गेला होता. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना आरोपी करण्यात आले असून, त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. राजपूत याला पकडण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले होते.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली दीड महिन्यापासून पथक राजपूतच्या मागावर लावले होते. दोन दिवसांपूर्वी त्याने पोलिसांना हुलकावणी दिली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. योगेश उबाळे, कर्मचारी श्यामल कांबळे, कृष्णा तंगे, धीरज भोसले, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, योगेश सहाणे यांनी गुरुवारी गुप्त माहितीवरून जळगाव जिल्ह्यातील नेरीजवळ असलेल्या पळसखेडा मिराचे या गावातील एका नातेवाइकाच्या शेतात लपून बसलेल्या डॉ. दिलीपसिंग राजपूत याला जेरबंद केले आहे.
१० आरोपी अद्याप फरार
या प्रकरणात अद्याप १० आरोपी फरारच आहेत. त्यांना अटक करण्यासाठीही पोलिसांकडून भोकरदन व एलसीबी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.