आठ दिवसांपासून भोकरदनचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:10 AM2018-09-28T01:10:38+5:302018-09-28T01:10:57+5:30
भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
फकीरा देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही प्रशासन कुठल्याच हालचाली करत नाही.
यावर्षी पाऊस नसल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी दोन्ही धरणे कोरडेठाक पडली आहेत. त्यामुळे भोकरदन शहरासह परिसरातील २५ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा बंद असून, पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी नगरपरिषदेकडून शहरालगतच्या विहिरींचा गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, विहिरींमध्ये काही प्रमाणात पाणी येत असल्याने हे पाणी फक्त दोन ते तीन दिवस पुरत आहे. निवडणुकीच्या वेळी मते मागणारे नगरसेवक आता गेले कुठे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
कागदी घोडे नाचविण्याचे काम
पंधरा दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पाहणीही केली. परंतु, हालचाली झाल्या नाहीत. यासाठी नगरपरिषदेनेही विशेष सभा घेऊन टँकरचा प्रस्ताव तयार करुन पाठविला. मात्र, त्याच्यावरही काहीच काम झाले नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन किमान दिवसातून १० टँकरने भोकरदनला पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.