'लोकशाही'वरील भन्नाट भाषण देणाऱ्या 'भोऱ्या'ची मुख्यमंत्र्यांनाही भुरळ; लवकरच घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 05:54 PM2023-01-30T17:54:24+5:302023-01-30T17:54:45+5:30
अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील कार्तिक गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
- दादासाहेब जिगे
मठपिंपळगाव ( जालना) : प्रजासत्ताक दिनी शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या एका दिवसात राज्यभरात प्रसिद्ध झाला. त्याच्या शाळेतील भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्याचा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण खळखळून हसत आहे. त्याच्या या भाषणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भुरळ घातली असून, त्यांनी कार्तिकला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील कार्तिक गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिनी त्याने शाळेत भाषण केले. त्याने आपल्या भाषणात लोकशाही आणि लोकशाहीतील स्वातंत्र्याची व्याख्या आपल्या अनोख्या अंदाजात आणि सोप्या भाषेत सांगितली. त्याच्या भाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकशाहीत भांडू शकता... दोस्ती करू शकता.. प्रेमाने राहू शकता. मला तर मोक्कार फिरायला, झाडावर माकडासारखे चढायला आवडते. असे भोऱ्याने आपल्या भाषणात सांगितले. त्याने आपल्या निरागस वाणीतुन आणि अनोख्या शैलीत केलेले हे भाषण सगळ्यांनाच भावत आहे.
कार्तिकला लाडाने गावात भोरे असे संबोधतात. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्याच्या वडिलांकडे अवघी दोन एकर शेती आहे. कार्तिक घरातील व्यक्तींबरेाबरच अख्ख्या गावाचा आणि शाळेतील शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे. कार्तिकला एक माेठी बहीण आणि एक भाऊ आहे. आई घरकाम, तर वडील ट्रॅक्टर चालवतात. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी त्याच्याशी व्हिडीओ काॅलद्वारे संवाद साधून त्याला २ फेब्रुवारी रोजी परतूर तालुक्यातील वाटूर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास येण्याचे निमंत्रण दिले आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री भोऱ्याची भेट घेणार आहेत. भोऱ्याला नेत्रदोष आहे. त्याच्या या आजारावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे उपचारासाठी दाखविण्यात येणार असल्याचे दादासाहेब थेटे यांनी सांगितले.
सतीश घाटगेंनी स्वीकारले कार्तिकचे पालकत्व
घनसावंगी तालुक्यातील समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे नेते सतीश घाटगे यांनाही कार्तिकला भेटण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी रेवगाव येथे जाऊन त्याची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी कार्तिकचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च ते उचलणार आहेत.