भुजबळांच्या एल्गार सभेला सडेतोड प्रत्युत्तर देणार; जरांगेंच्या जालन्यातील सभेचं ठिकाण अन् वेळ ठरली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 01:36 PM2023-11-19T13:36:30+5:302023-11-19T13:39:42+5:30
आरक्षण प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सुरू असलेलं वाक् युद्ध आता आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जालन्यात पुन्हा एकदा जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
जालना -मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक कलगीतुरा सुरू आहे. आमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान दिल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकतीच जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींची एल्गार सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधत ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देणार नसल्याचं म्हटलं. छगन भुजबळ यांच्या एल्गार सभेला उत्तर देण्यासाठी आता सकल मराठा समाजाकडून जालन्यातच मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील आझाद मैदानात १ डिसेंबर रोजी ही सभा होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यासाठी काल (१८ नोव्हेंबर) सकल मराठा समाजासाठी जालन्यात बैठक पार पडली. या बैठकीत सभेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसंच सभेला लाखोंची गर्दी जमावी, यासाठी पुढील काही दिवसांत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जालन्यात १ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर!
छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभेत जरांगे पाटील यांच्यावर काही वैयक्तिक आरोप केले होते. तसंच मराठा समाजाने विविध ठिकाणी लावलेले गावबंदीचे फलक, बीडसारख्या शहरांत झालेल्या जाळपोळीच्या घटना यांवरही भाष्य करत दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. भुजबळ यांच्या या टीकेला जालन्यातील सभेतून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सभेच्या दिवशी शहरातील व्यापारी बांधवांचं नुकसान होऊ नये म्हणून कोणत्याही बंदचं आवाहन केलं जाणार नसल्याचंही मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अंबड येथील सभेत काय म्हणाले होते छगन भुजबळ?
"मराठा समाजाचा आता एक नवीन नेता निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले. पण त्यांचा अभ्यास नाही. आम्हाला आरक्षण घटनेने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. मंडल आयोगाने दिलं आहे. नऊ न्यायमूर्तींनी त्यावर शिक्का मारला. आम्ही हक्काचे खातो, तुझ्यासारखे सासरच्या घरी तुकडे मोडत नाही. दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला? गावबंदीचे फलक लावता, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिला आहे का?" असा सवाल करत छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.