सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:21 AM2021-01-01T04:21:00+5:302021-01-01T04:21:00+5:30
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यास २०० रुपये दंड नावालाच लोकमत न्यूज नेटवर्क जालना : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई ...
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यास २०० रुपये दंड नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई असताना हा नियम कोठेही पाळला जात नाही. प्रशासनाकडूनही सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास २०० रूपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. दंड करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आहेत. तसेच बसस्थानक परिसरात आगारप्रमुखाला, शाळा परिसरात मुख्याध्यापक व महाविद्यालय परिसरात प्राचार्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. या अनुषंगाने जालना शहरातील बसस्थानकाची आमच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता, तेथे बहुतांश लोक सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना आढळले. बसस्थानक परिसरात काही हाॅटेलमध्ये चहा पिण्यासाठी बहुतांश जण येतात, तेव्हाच काहीजण सिगारेटही ओढतात. यावेळी त्यांच्या बाजूला उभे असलेल्यांना वा बसलेल्यांना तोंडाला रूमाल बांधावा लागतो. बसस्थानकातही सार्वजनिक ठिकाणी अनेकजण धुम्रपान करत असतानाही त्यांच्यावर आगारप्रमुखांकडून कारवाई केली जात नाही.
शहरातील अन्य सार्वजनिक ठिकाणीही सर्रास धुम्रपान केले जात आहे. शाळा, महाविद्यालयांमध्येही अशीच स्थिती आहेत. याठिकाणीही धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
प्रशासनाने १६ जणांकडून वसूल केला दंड
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गत दोन महिन्यात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या १६ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १,४०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून कारवाई केली जात असून, यापुढेही तीव्र कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘अन्न, औषध’ला
दंडाचे अधिकार प्राप्त
दंड करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आहेत. बसस्थानक परिसरात आगारप्रमुखाला, शाळा परिसरात मुख्याध्यापक व महाविद्यालय परिसरात प्राचार्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु, तरीही दंड आकारण्याकडे कानाडोळा केला जात आहे. याविषयी कारवाई होणे गरजेचे आहे.
बिडी-सिगारेट
ओढल्याचे धोके
बिडी-सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचे आजार जडतात. यासह कर्करोग, गळ्याचे आजार, तोंडाचे आजारही होतात. नागरिकांनी बिडी-सिगारेट ओढू नये, असे आवाहन डाॅक्टरांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास इतर लोकांनाही त्यापासून आजारांचा धोका आहे.