जालन्यात १०० ब्रास वाळू जप्त; १४ वाळू तस्करांच्या सातबारावर टाकणार दंडाचा बोजा
By शिवाजी कदम | Published: May 23, 2024 06:21 PM2024-05-23T18:21:05+5:302024-05-23T18:21:55+5:30
अंबड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध उपसा व उत्खनन होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
गोंदी / शहागड (जि. जालना) : अंबड तालुक्यातील शहागड येथील १४ वाळू तस्करांविरोधात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशाने गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मे रोजी सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहागड येथील राष्ट्रीय महामार्ग नवीन उड्डाणपुलाखाली गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करत असताना कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावावर असणाऱ्या सातबाऱ्यावर दंडाचा बोजा टाकण्यात येणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.
अंबड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध उपसा व उत्खनन होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहागड येथील सोलापूर-धुळे महामार्गावरील नवीन उड्डाणपुलाच्या खाली ८ ट्रॅक्टर अवैध उपसा करून वाहतूक करत असल्याचे महसूल पथकास आढळून आले होते. पथकाला बघून ट्रॅक्टरचे चालक व मालक व लोकेशन देणारे पळून गेले होते. यानंतर बुधवारी रात्री गोंदी पोलिस ठाण्यात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच साडेपाच लाख रुपये किमतीची १०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके, मोहित गौशिक, मंडळ अधिकारी नारायण बमनावत, संजय भिसे, तलाठी कैलास घारे, कोतवाल अशोक शिंदे यांनी केली.
वाळू माफियांच्या सातबारावर दंडाचा बोजा
अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन तत्परतेने कारवाई करत आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या जमिनीच्या सातबाऱ्यावर दंडाचा बोजा टाकण्यात येणार आहे.
- चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार, अंबड.