मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:59 PM2024-09-10T12:59:30+5:302024-09-10T13:01:36+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा आज सकाळी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेतून केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.
आज सकाळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. "आमचा नोंदीचा रेकॉर्ड कसा जळाला, त्याचा पंचनामा कुठेय?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही कोणताही ठोस परिणाम मिळाला नसल्याची टीका त्यांनी केली. हैदराबादमध्ये सापडलेले ८ हजार पुरावे कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, "फडणवीस तिहेरी पद्धतीने मराठा समाजाला संपवत आहेत."
"माझ्या उपोषणाकडे कुणी येवो अथवा न येवो, आता सरकारला कळेल उपोषण किती खतरनाक असतं," असं जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला संयम राखण्याचं आवाहन केलं आणि कोणत्याही प्रकारचं आंदोलन न करण्याचं आवाहन केलं.
तुम्ही पक्षासाठी तर मी समाजासाठी बोलतो
मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर देखील जहरी टीका केली. "मराठ्यांचं मतदान तुम्हाला निवडणुकीत मिळालं नाही, हे स्पष्ट करा," असा सवाल त्यांनी केला. तसेच त्यांनी म्हटलं, "माझं राजकारणात जाण्याचं कोणतंही स्वप्न नाही, मला फक्त माझ्या समाजाला न्याय मिळावा, एवढीच माझी मागणी आहे." आमदार राऊत यांना उद्देशून त्यांनी म्हणलं, "तुम्ही पक्षासाठी बोलता, मी समाजासाठी बोलतो. दुसऱ्यासाठी वेगळा आणि स्वतःसाठी वेगळा न्याय ही कोणती कामाची पद्धत आहे?" त्यांनी फडणवीस यांचं समर्थन करणाऱ्या आमदारांना देखील सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, "गरीब मराठ्यांमध्ये कधीही फूट पडत नाही, श्रीमंतीची फूट पहिल्यापासून आहे."