भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर स्विफ्ट आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक ; ६ जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 07:42 AM2024-06-29T07:42:14+5:302024-06-29T07:42:38+5:30
अपघातातील जखमी प्रवाशांना जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Samruddhi Highway Accident ( Marathi News ) : जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना समृद्धी महामार्ग व शिंदखेडा राजा येथील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींमधील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना नियंत्रण कक्ष समृद्धी यांच्याकडून महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता स्विफ्ट डिझायर ( क्रमांक एम एच १२, एम एफ १८५६) आणि इर्टिगा (क्रमांक एम एच ४७, बी पी ५४७८) यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याचं स्पष्ट झालं. यातील एक कार चुकीच्या दिशेने आल्याने हा अपघात झाला. सदर अपघातामध्ये इर्टिगा कारमधील फैजल शकील मन्सुरी, फय्याज मन्सुरी, अल्थ मेस मन्सुरी (सर्व राहणार मालाड पूर्व, मुंबई) आणि स्विफ्ट कारमधील लक्ष्मण मिसाळ, संदीप बुधवंत, विलास कायंदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
इर्टिगा कारमधून सहा जण प्रवास करीत होते. ते नागपूरहून मुंबईकडे जात होते. तसेच स्विफ्ट डिझायर कारमध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करीत होते. ही कार विरुद्ध दिशेने सिंदखेड राजाकडे जात असताना समोरासमोर धडकून होऊन अपघात झाला आहे. सदर अपघातातील गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना समृद्धी महामार्ग व शिंदखेडा राजा येथील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ सामान्य रुग्णालय, जालना इथं पाठवण्यात आलं. तसंच गाडीत अडकलेल्या लोकांना कटरच्या साहाय्याने दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, महामार्ग परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस निरीक्षक गिरी आणि पोलीस स्टेशन तालुका येथील पोलीस निरीक्षक उनवणे, पोलीस स्टेशन चंदंजिरा येथील पोलीस निरीक्षक परदेशी यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची पाहणी केली.