जालन्यात आयकरची मोठी कारवाई; २०० अधिकाऱ्यांच्या पथकाचे पहाटेच व्यापाऱ्यांवर छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 07:27 PM2022-08-04T19:27:37+5:302022-08-04T19:28:09+5:30
सर्व अधिकारी आणि कर्मचारी सरासरी शंभर कारमधून ज्यांच्या घरी छापे टाकायचे आहेत, त्याच्या निवासस्थानी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये दाखल झाले.
जालना : शहरातील कालिका स्टील, एसआरजे स्टील, व्यावसायिक विमलराज सिंघवी यांच्यासह अन्य १० ते १२ व्यापाऱ्यांवर प्राप्तीकर विभागाने बुधवारी पहाटे छापे टाकले आहेत. या कारवाईने उद्योजक, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या छाप्यातून नेमके काय हाती आले, हे कळू शकले नाही. परंतु बँक खात्यांसह अन्य व्यवहारांची अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
या प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, तसेच औरंगाबादेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सरासरी शंभर कारमधून ज्यांच्या घरी छापे टाकायचे आहेत, त्याच्या निवासस्थानी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये दाखल झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही मराठवाड्यातील सर्वांत मोठी कारवाई असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. हे छापे टाकण्यामागचे कारण विचारले असता, ते सांगण्यास नकार देण्यात आला.
जालन्यातील जिंदल मार्केटमधील तीन दुकान या अधिकाऱ्यांनी सील केल्याचे स्टिकर चिकटविले आहे, तर दुसरीकडे उत्पादन आणि विक्री याबाबतच्या नोंदी तपासल्या असून, बँकांमधील झालेले ट्रांजेक्शनही तपासले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुठल्या उद्योगांचे कुठल्या बँकेेत खाते आहे, त्या बँकांचा तपशीलही अधिकाऱ्यांनी मागविला आहे. विशेष म्हणजे कुठल्या व्यापारी, उद्योजकाकडे किती रोख रक्कम आढळली की नाही, बाबतही माहिती देण्यास नकार देण्यात आला. मागील वर्षीदेखील असे मोठे छापे जालन्यातील तीन उद्योजकांवर पडले होते. परंतु त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी आले नसल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवस चालू शकते कारवाई
एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्राप्तीकर विभागाचे अधिकारी जालन्यात येण्यामागचे कारण समजू शकले नाही. परंतु शहरातील व्यापाऱ्यांमध्ये यामुळे दिवसभर हीच चर्चा होती. कुठल्या ना कुठल्या घरभेद्याने प्राप्तिकर विभागाला पक्की टीप दिल्याशिवाय ही कारवाई होऊ शकत नसल्याचेही सांगण्यात आले. काहींनी हे छापे पडल्यावर ज्या उद्याेजक, व्यावसायिकांना काही रोखीतील उधारी देणे शिल्लक असल्यास ती टाळण्यासाठी या कारवाईचा उपयोग करून घेता येत असल्याचीही जोरदार चर्चा होती. हवालातून होणाऱ्या या उलाढालीमुळेदेखील एवढे अधिकारी येथे आले असल्याचेही सांगण्यात आले.