पोलिस भरती लेखी परीक्षेत मोठा घोटाळा; फेरपरीक्षा घेण्याची आमदार कैलास गोरंट्यालांची मागणी
By विजय मुंडे | Published: May 20, 2023 07:35 PM2023-05-20T19:35:33+5:302023-05-20T19:38:00+5:30
मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असून, आमच्यावर मोठा झाल्याची व्यथा जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी व्यक्त केली
जालना : मुंबईत झालेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. या घोटाळ्याची उच्चस्तरीय समिती मार्फत सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी फेर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणीही आ. कैलास गोरंटयाल यांनी शनिवारी जालना येथे येथे बोलतांना केली.
मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असून, आमच्यावर मोठा झाल्याची व्यथा जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी आ.कैलास गोरंट्याल यांची भेट घेऊन मांडली. अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहात परीक्षार्थींनी शनिवारी दुपारी आ.गोरंटयाल यांची भेट घेवून झालेल्या अन्यायाचे कथन केले. अन्यायग्रस्त परीक्षार्थीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ.कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित अन्यायग्रस्त तरुण आणि तरुणींना धीर देत ते म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अन्य जिल्ह्यातील परीक्षार्थीवर देखील अन्याय झाला असेल अशी शंका आहे. लेखी परीक्षेच्यावेळी पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गुगल सर्च करून बटण कॅमेऱ्याच्या माध्यमातून परीक्षेचा पेपर बाहेर पाठवून सार्वजनिक करत मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यासाठी परीक्षार्थीकडून प्रत्येकी १० ते १२ लाख रुपयांची लाच घेण्यात आल्याचे अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी सांगितल्याचे आ. गोरंटयाल म्हणाले. या प्रकरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याबरोबरच जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
धरणे आंदोलन करणार
मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेतील घोटाट्याची चौकशी करावी, अन्यायग्रस्तांवरील अन्याय दूर करावा, यासाठी आपण २२ मे रोजी सोमवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार, गणेश चांदोडे, गणेश दाभाडे, संतोष खरात यांच्यासह मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत अन्यायग्रस्त परीक्षार्थी उपस्थित हाेते.