मोबाईलवर बोलण्यासाठी बाईक थांबली अन् घात झाला; अपघातात महिला ठार तर पती-मुलगा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 07:15 PM2021-09-18T19:15:22+5:302021-09-18T19:17:54+5:30
पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने बाईकवरील कुटुंबाला चिरडले
अंबड : रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. यात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्वाती पांडुरंग चाळक (३०) असे मयत महिलेचे नाव आहे. तर पांडुरंग मधुकर चाळक (३५) व अरुष पांडुरंग चाळक (४, सर्व रा. किनगाव ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पांडुरंग चाळक हे आपल्या पत्नी व मुलासोबत अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील नातेवाइकांकडे आले होते. शनिवारी ते ताडहादगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास तिघेही दुचाकीने ताडहादगावहून चुर्मापुरीकडे जात होते. शहापूरजवळ आल्यावर मोबाइलवर बोलण्यासाठी पांडुरंग चाळक यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात स्वाती चाळक या जागीच ठार झाल्या. पती पांडुरंग चाळक आणि मुलगा अरूष हे जखमी झाले. त्यांना नातेवाइकांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासून स्वाती चाळक यांना मयत घोषित केले. जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा -
- लग्नापूर्वीचे पत्नीचे तरुणासोबतचे फोटो पाहिले; अस्वस्थ तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
- क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू