बायोमेट्रिकचा बागुलबुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:02 AM2018-12-02T01:02:30+5:302018-12-02T01:02:40+5:30
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज वर्गात हजेरी लावणे बंधनकारक करण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन करण्याकडे अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे
संजय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षण क्षेत्रातील ढासळत्या गुणवत्तेसह घटणाऱ्या विद्यार्थी संख्येवर उपाय म्हणून आता राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज वर्गात हजेरी लावणे बंधनकारक करण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन करण्याकडे अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालांची तपासणी केल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.
गेल्या वीस वर्षात खासगी कोचिंग क्लासचे फॅड एवढे वाढले की, महाविद्यालये ही केवळ एक बोर्डाची परीक्षा देण्यासाठीचे रजिट्रेशन सेंटर बनली आहेत, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. याला ज्या प्रमाणे विद्यार्थी व पालक जबाबदार आहेत, त्यापेक्षा अधिक महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संस्थाचालक तसेच शासनाचे दुर्लक्ष हेही एक प्रमुख कारण म्हणावे लागेल. वाढती लोकसंख्या आणि शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा यामुळे आपला पाल्य त्यात टिकला पाहिजे या दृष्टीने विचार होऊ लागला. त्यामुळेच खासगी कोचिंग क्लासची संस्कृती फोफावली आहे. दुसरे एक कारण म्हणजे सरकारने विनाअनुदानित तत्वावर सुरू केलेले भरमसाठ कनिष्ठ महाविद्यालय हे देखील आहे. ज्या प्राध्यापकांना नोकरीची संधी मिळते तेथे त्यांना किती वेतन मिळते हा संशोधनाचा विषय आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित यातील फरकही शिक्षणच्या मूळावर उठला आहे. काही मोजक्या संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी लागण्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार होतात हे जगजाहीर आहे. त्यामुळे आपण कसे नोकरीला लागतो याची जाण त्यांना असते. आणि आपण कशी नोकरी दिली याची माहिती संस्थाचालकाला असल्याने कोणाचाच कोणाला धाक राहिलेला नसल्याने देखील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. आजची परीक्षा पध्दतीही केवळ ओब्जेक्टीव झाली आहे. त्यामुळे सीईटी सारख्या अन्य पात्रता परीक्षांची तयारी करण्यातच विद्यार्थी व पालक महत्व देत आहेत. गुण मिळवणे हाच एक उद्देश विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवल्याने त्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळत नसल्याचे दिसून आले. मुलांच्या गुणवत्तेवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे, तो सोशल मीडियाने आज दहावी नंतरचा विद्यार्थी हा पुस्तकात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त डोके घालून बसतो आहे. नाती-गोती तसेच सामाजिक भान, जबादारी यापासून दूर जातांना दिसत आहे. प्रसिध्द शास्त्रज्ञ आईनस्टाइन यांनी फारवर्षापूर्वी सांगून ठेवले की, कल्पकता ही ज्ञानापेक्षा महत्वाची असते परंतु हे त्यांचे सुविचार पुस्तकातच आहेत. हे प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. परंतु हे ना शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात ना पालक यामुळे देखील युवक-युवती देखील आपल्याच जगात रमरमाण असतात. कोचिंग क्लासची फी ही सर्वसामान्य पालकांच्या खिशाला न परडवणारी आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अनेकजण पदरमोड करून का होईना पाल्याला कोचिंगला पाठवत आहेत. तसेच इतर उद्योगांप्रमाणे एज्युकेशन ही देखील एक इंडस्ट्री झाली आहे. केवळ मार्क मिळवूनच जीवनात यशस्वी होता येते, ही संस्कृती रूजत असल्याने याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. अनेक पालक हे त्यांचे व्यवसाय सोडून दुस-या शहरातच नव्हे तर दुस-या राज्यात पाल्यांसाठी जातात.