भाजप,सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग; महायुतीचे पाच आमदार तरीही जालन्यात काँग्रेसचा विजय

By विजय मुंडे  | Published: June 6, 2024 07:46 PM2024-06-06T19:46:02+5:302024-06-06T19:46:16+5:30

दोन वेळा आमदार, पाच वेळा खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असणारे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पराभवाचा झटका

BJP, Sena supremacy destroyed; Five MLAs of Mahayuti still win for Congress in Jalana | भाजप,सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग; महायुतीचे पाच आमदार तरीही जालन्यात काँग्रेसचा विजय

भाजप,सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग; महायुतीचे पाच आमदार तरीही जालन्यात काँग्रेसचा विजय

जालना : जालना लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार आणि काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे. परंतु, मंगळवारी लागलेल्या निकालात महायुतीचे पक्षीय बलाबल केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून आले. दोन वेळा आमदार, पाच वेळा खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असणारे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पराभवाचा झटका देत डॉ. कल्याण काळे यांनी २८ वर्षांनंतर जालना लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकावीत कार्यकर्त्यांसह गुलाल उधळला.

जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच मतदारसंघात चुरस दिसून आली. प्रचार यंत्रणेत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, मविआचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी नेत्यांच्या सभा आयोजित करण्यासह बूथनिहाय अधिकाधिक मतदान करून घेण्याचे नियोजन केले होते. या मतदारसंघात भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे सुपत्र आ. संतोष दानवे, बदनापूरमध्ये भाजपचे आ. नारायण कुचे, फुलंब्री येथे भाजपचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे हे आहेत, तर पैठणमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे, आणि सिल्लोड येथे शिवसेना शिंदे गटाचे आ. अब्दुल सत्तार आहेत.

या पाचही आमदारांनी, मंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या जाहीर सभांमधून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना अधिकाधिक मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ४ जूनला लागलेल्या निकालात महायुतीचे आमदार आणि मंत्री असणाऱ्या एकाही विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना मताधिक्य मिळाल्याचे दिसत नाही. विशेषत: पैठण, फुलंब्री, सिल्लोड या मतदारसंघातून २७ हजारांहून अधिक मताधिक्य काळे यांना मिळाले आहे. आ. नारायण कुचे यांच्या बदनापूर मतदारसंघातून १३ हजार ४७२ आणि दानवे यांचे होमपीच आणि मुलगा संतोष दानवे आमदार असणाऱ्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातूनही काळे यांनाच ९६२ मतांची लीड मिळाली आहे.

विधानसभेवर होणार परिणाम
जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन हे विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. येथे मविआला मताधिक्य मिळाले आहे. फुलंब्रीत भाजप, तर पैठण, सिल्लोडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यातील बदनापूर, भोकरदन, फुलंब्री या भाजपच्याच मतदारसंघात बदलाचे वारे अधिक दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे आपला गड ताब्यात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, तर सिल्लाेडमध्ये सतत पक्ष बदलणारे अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे तेथे अधिक बदलाचे वारे राहतील, असे चित्र सध्या तरी नाही.

विधानसभा- कल्याण काळे- रावसाहेब दानवे- मंगेश साबळे- प्रभाकर बकले
जालना-९३,७५६- ८३,९६६-६,०८६- ९३६२

बदनापूर-१,०२,९५९- ८९,४८७-१९,९५४- ५४९८
भोकरदन- १,००,०१३- ९९,०५१- १९,९०५- ३६९४

सिल्लोड- १,०१,०३७- ७३,२७८- ४१,३४३- ६३००
फुलंब्री- १,१२,७२०- ८२,८६४- २८,६६४- ७५७९

पैठण- ९५,०१९-६७,१६३- ३९,३८३-५२४५
पोस्टल- २३९३-२१३०-५९५- १३२

एकूण-६,०७,८९७- ४,९७,९३९- १,५५,९३० -३७,८१०

Web Title: BJP, Sena supremacy destroyed; Five MLAs of Mahayuti still win for Congress in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.