जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची लागणार कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:59+5:302020-12-24T04:27:59+5:30
जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होणार आहे. पक्षपातळीवर ही लढत खरी असली ...
जालना : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होणार आहे. पक्षपातळीवर ही लढत खरी असली तरी प्रत्यक्षात मात्र पॅनलच्या माध्यमातून गावातील दोन गट एकमेकांसमोर येतात. त्यामुळे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते कुठल्या पॅनलमध्ये आहेत, हे सांगणे कठीण होते.
गावपातळीवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता कोरोनाच्या काळात जाहीर झाल्या आहेत. वास्तवात या निवडणुका मुदत संपल्याने जूनमध्ये होणे अपेक्षित होते; परंतु त्या काळात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर असल्याने निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी होऊ घातलेल्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत राहून त्यावर झेंडा फडकविण्यासाठी जय्यत तयारी चालविली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापही पॅनलमधील नावे निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे उमेदवारी भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पॅनलमधील उमेदवारांची यादी निश्चित होणार नसल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु गावपातळीवर फार कमी ठिकाणी बिनविरोध निवडणुका होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अ.भा. काँग्रेस समितीचे भीमराव डोंगरे, कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांचा कस लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांचा कस लागणार आहे. परतूर तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर विरुद्ध माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया अशीच, लढत होईल. जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा येथे सरळ लढती होणार आहेत. प्रामुख्याने भोकरदन तालुक्यात माजी आमदार चंद्रकांत दानवे विरुद्ध आमदार संतोष दानवे यांचा कस लागणार आहे. या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच कोणता पक्ष वरचढ ठरला हे कळेल.
या तालुक्यात लक्षवेधी
जालना- अर्जुन खोतकर विरुद्ध भास्कर दानवे
परतूर- बबनराव लोणीकर विरुद्ध सुरेश जेथलिया
घनसवंगी- राजेश टोपे विरुद्ध शिवाजी बोबडे
भोकरदन- संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे
सर्वच तालुक्यांत रंगत
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत निवडणुका रंगतदार होणार आहेत. जाफराबाद वगळता अन्यत्र ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.