जालना जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची जादू की, भाजपकडून दिला जाणार धक्का !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:43 AM2020-01-06T00:43:08+5:302020-01-06T00:43:23+5:30
राज्यातील सत्तांतरण नाट्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील सत्तांतरण नाट्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. निवडीसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया होणार असून, भाजपा व महाविकास आघाडीकडून ‘आमच्याकडे बहुमत आहे’ असा दावा केला जात असून, दोन्ही गटातील पक्षनेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्तेच्या सारिपाटावर फोडाफोडी होऊ नये म्हणून सदस्यांनाही सहलीवर पाठविण्यात आले आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी २९ सदस्यांची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाकडे २२, सेनेकडे १४, राष्ट्रवादीकडे १३, काँग्रेसकडे ५ आणि अपक्ष २ असे एकूण ५६ सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून साष्टी पिंपळगाव सर्कलचे राष्ट्र्वादीच्या नितू संजय पटेकर, शिवसेनेकडून वरूड सर्कलचे उत्तम वानखेडे यांची नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्षपदावर विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही नजर ठेवून आहेत. भाजपकडून अध्यक्षपदासाठी कोकाटे हदगाव सर्कलच्या सदस्या वैजयंती प्रधान, कराड सावंगी सर्कलच्या रेणुका हनवते तर उपाध्यक्षपदासाठी आशा पांडे, राहुल लोणीकर, अवधुत खडके, डॉ. चंद्रकात साबळे, शालीराम म्हस्के यांच्या नावांची चर्चा आहे.
राज्यात भाजपा- शिवसेनेत काडीमोड होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र, जालना जिल्हा परिषदेत यापूर्वीच भाजपाला बाजूला करून महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली होती. हीच आघाडी कायम रहावी, यासाठी वरिष्ठस्तरावरून सूचना आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल यांनी प्रयत्न सुरू केल्या आहेत. तर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकाविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. सदस्यांची फोडाफोडी होऊ नये म्हणून सर्व सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. असे असले तरी दोन्ही गटाकडून बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ऐनवेळी राजकीय नाट्य घडणार की पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत येणार ? याकडे लक्ष लागले आहे.
फोडाफोडीच्या राजकारणात भाजप आक्रमक
भाजपने महाविकास आघाडीचे सदस्य फोडल्याचा दावा केला आहे. यात शिवसेना ३, राष्ट्रवादी २ काँग्रेस २ सदस्य फोडल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. परंतु, महाविकास आघाडीने गेलेले सर्व सदस्य परत आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज कोणत्या पक्षाने किती सदस्य फोडले हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भाजपचे अरविंद चव्हाण हे महाविकासआघाडी सोबत असल्याची चर्चा आहे.
अशी होणार मतदान प्रक्रिया
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी १ वाजता सभेला सुरूवात होणार आहे. १ वाजल्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी १.१५ ते १.३० वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेणे तर दुपारी १.३० वाजण्याच्यानंतर आवश्यकता असल्यास मतदान घेऊन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.