रावसाहेब दानवेंच्या गावात भाजपचाच झेंडा; सरपंचपदी भावजय सुमन दानवे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:50 PM2022-12-20T17:50:33+5:302022-12-20T17:51:39+5:30
सरपंचपदासाठी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली.
भोकरदन ( जालना) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मुळ गाव असलेल्या भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक तीस वर्षापासून बिनविरोध होत आली. परंतु, यंदा सरपंचपदाचे तीन उमदेवार रिंगणात उतरल्याने मतदान घेण्यात आले. भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये झालेल्या थेट लढतीत शेवटी रावसाहेब दानवे यांच्या मर्जीतलाच सरपंच जनतेने निवडून दिला आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावजय असलेल्या सुमन दानवे या गावच्या सरपंच म्हणून विजयी झाल्या आहे. रावसाहेब दानवे यांनी आपल्या राजकारणाला जवखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून सुरवात केली होती. गेली ३० वर्ष गावात भाजपाच्या सरपंचाची बिनविरोध निवड झालेली आहे. ७ सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणुकीत ५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. परंतु, राष्ट्रवादीकडून सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात उतरवल्याने सरपंच पदासाठी निवडणुक घ्यावी लागली.
सरपंचपदासाठी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली. त्यात सुमन दानवे यांनी राष्ट्रवादीच्या सुनिता दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे.