शेतीच्या वादातून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:14 AM2018-07-16T01:14:44+5:302018-07-16T01:15:01+5:30
बहिणीकडील शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी/देऊळगावराजा : बहिणीकडील शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
बुटखेडा येथील दीपक दिलीप साबळे (३५) यांची विधवा बहिण तिचे सासर उम्रद (ता. जालना) येथे राहत होती. दरम्यान बहिणीसोबत तिच्या चुलत दिराचे शेतीचे भांडण सुरू होते. हा वाद मिटविण्यासाठी दीपक साबळे आपल्या कुटुंबातील इतरांसोबत शनिवारी उम्रद येथे गेला होता. वाद मिटला म्हणून ते सर्व आपले गाव बुटखेड्याकडे परत आले. मात्र दीपक सोबत बहिणीचे चुलत दीर व इतर तिघे - चौघे देवळगावराजा पर्यंत आले. सायंकाळी दीपक साबळे देऊळगावराजा येथून आपले गाव बुटखेडा कडे निघाले असता देऊळगावराजा येथील कस्तुरबा हायस्कूल च्या थोडे पुढे आल्यानंतर बहिणीचे चुलत दीर भाऊसाहेब शिंदे व हिरासाहेब शिंदे यांनी दीपकवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात दीपक जागीच ठार झाला.
दरम्यान मयताचा भाऊ प्रमोद साबळे याने नोंदविलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध देऊळगावराजा येथे गुन्हा नोंद आहे.
दीपक साबळे हा तरूण गावच्या सामाजिक कामात नेहमीच हिरीरीने भाग घ्यायचा. खेळाडू असलेल्या दीपक मध्ये नेतृत्वगुण होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोघे भाऊ, असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बुटखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.