महाबळेश्वरसारखे मोती तलावात बोटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:14 AM2018-02-13T01:14:21+5:302018-02-13T01:14:47+5:30
वेण्णा लेक (महाबळेश्वर) च्या धर्तीवर शहरातील मोती तलावात लवकरच बोटिंग सुरु करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.
जालना : वेण्णा लेक (महाबळेश्वर) च्या धर्तीवर शहरातील मोती तलावात लवकरच बोटिंग सुरु करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. सोमवारी मोती तलावात बोटिंगचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यावेळी नगराध्याक्षा बोलत होत्या.
यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, एकबाल पाशा, बबलू चौधरी, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, शिक्षण व आरोग्य सभापती रघुनाथ तौर, न. प. भाजपा गट नेते अशोक पांगारकर, रामधन कळंबे, सभापती महावीर ढक्का, नगरसेवक शाह आलम खान, जयंत भोसले, विष्णू वाघमारे, राहुल हिवराळे, राधाकिसन दाभाडे, इसाखान पठाण, कृष्णा पडूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गोरंट्याल म्हणाल्या की, वाढत्या धावपळीतून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी शहरातील बहुतांशी कुटुंब आणि बच्चे कंपनी छत्रपती संभाजी उद्यानात येतात. उद्यानाला लागून असलेल्या तलावात बोटींग सुरु करण्याचा मानस होता. त्यासाठी पुणे येथील पिरॅमिड इंजिनिअरिंग कंपनीशी संपर्क साधून बोलणी करण्यात आली असून सोमवारी प्रायोगिक तत्त्वावर हे प्रात्यक्षिक करण्यात आले. लवकरच आणखी दोन बोटी मागवण्यात येणार आहेत. या प्रयत्नाला जालनेकरांकडून प्रतिसाद मिळाला तर आणखी सहा बोट कंपनीकडून मागवण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आ. गोरंट्याल म्हणाले की, अटल अमृत उद्यान योजनेअंतर्गत मोती तलावाच्या पाठीमागे असलेल्या २५ एकर जागेत नागरी उद्यान उभारण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे काम सुरु झाले आहे. या उद्यानात सायकल ट्रॅकसह बोटिंगची व्यवस्थाही राहणार असल्यामुळे या उद्यानामुळे शहराच्या वैभवात भर पडेल. कंपनीचे अभियंता सागर गलांडे यांनी सांगितले, की या बोटीची वजन क्षमता पाचशे ते सहाशे किलो इतकी असून सहा प्रवासी बसू शकतात. फायबर ग्लास रेनफोर्सच्या माध्यमातून ही बोट तयार करण्यात आलेली असल्यामुळे ही बोट पाण्यात बुडत नाही. बोटमध्ये बसणा-या व्यक्तींना सुरक्षा जॅकेट पुरविले जाणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, बबलू चौधरी आदींनी बोटीतून फेरफटका मारला.