सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 01:03 AM2020-01-09T01:03:55+5:302020-01-09T01:04:25+5:30
जालना तालुक्यातील कुंभेफळ येथील साठवण तलावात पाच तरूण पोहण्यासाठी मंगळवारी गेले होते. त्यातील दोन तरूणांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना तालुक्यातील कुंभेफळ येथील साठवण तलावात पाच तरूण पोहण्यासाठी मंगळवारी गेले होते. त्यातील दोन तरूणांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी रात्र झाल्याने त्या बुडालेल्या तरूणांचा शोध घेणे शक्य झाले नव्हते. बुधवारी सकाळी जालन्यातील अग्निशमन दलाने सकाळी दहा वाजेला बोटीव्दारे सुरू केलेली शोध मोहीम सहा तास चालली. एका युवकाचा मृतदेह साडेबारा वाजेच्या दरम्यान तर दुसऱ्या युवकाचा मृतदेह साडेचार वाजता सापडल्याचे अग्निशमन दलाचे सहायक अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले.
मंगळवारी कुंभेफळसह जालन्यातील पाच तरूण हे पोहण्यासाठी म्हणून कुंभेफळ येथील साठवण तलावावर गेले होते. त्यातील नारायण राठोड ( १८. रा. चंदनझिरा ) व नवनाथ प्रभाकर जाधव (१८, कुंभेफळ) या दोन जणांना पोहता येत नसताना त्यांनी खोल पाण्यात जाऊन पोहण्याचा प्रयत्न केला. त्यातच ते बुडाले. या दुर्घटनेत दोन तरूण बुडाल्याची माहिती उपसरपंच शिरसाट यांनी अग्निशमन दल तसेच तहसीलदारांना कळवली. त्यानंतर तहसीलदार भुजबळ यांनी तातडीने हालचाल करत, मंडळ अधिकारी हरि गिरी आणि तलाठी गिरी यांना घटनास्थळी रवाना केले होते.
परंतु सायंकाळ झाल्याने अग्निशमन अधिकाऱ्यांनी शोध मोहीम करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावरून ग्रामस्थ संतप्त झाले होते. परंतु माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी यात मध्यस्थी करून ग्रामस्थांचा रोष कमी केला. ही घटना दुर्दैवी आहे, परंतु आता अंधार झाल्याने मृतदेहांचा शोध घेणे शक्य नसल्याचे खोतकरांनी सांगितले. ही शोधमोहीम बुधवारी सकाळी हाती घेण्यात आली. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी बोटीव्दारे गळ टाकून या मृतदेहांचा शोध घेऊन हे दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढले. यावेळी त्या मयतांचे आई-वडील आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला. मृतदेह बाहेर काढल्यावर सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. या कामी कुंभेफळ येथील ग्रामस्थांची मोठी मदत झाली.
या शोध मोहिमेत अग्निशमन विभागाचे ज्ञानेश्वर जाधव, अब्दुल बासेद, सागर गडकरी, बोट आॅपरेटर नजीर चौधरी, विठ्ठल कांबळे, रवी बनसोडे, राहुल नरवडे, संतोष काळे, किशोर सगट, कुंदन पाटोळे, पंजाबराव देशमुख यांनी परिश्रम घेतले.