नदीपात्रात वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह आढळला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:16 AM2019-10-10T01:16:15+5:302019-10-10T01:16:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू शिवारातील गिरजा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा बुधवारी सकाळी मृतदेह आढळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू शिवारातील गिरजा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा बुधवारी सकाळी मृतदेह आढळून आला. दरम्यान, गिरजा नदीपात्रात अवैधरीत्या बेसुमार वाळूचा उपसा झाल्याने गत पंधरा दिवसात तिघांचा बळी गेला आहे.
बोरगाव तारु येथील गिरजा नदीच्या पाण्यात मंगळवारी सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक वाहून गेला होता. प्रशासकीय पथकासह ग्रामस्थांनी शोध मोहीम राबविली. मात्र, त्याचा काही शोध लागला नव्हता. बुधवारी सकाळी गावातील ग्रामस्थांनी बोटीच्या सहाय्याने शोध घेत्यानंतर सोमीनाथ याचा मृतदेह सापडला. केदारखेडा आरोग्य केंद्रात डॉ. संदीप घोरपडे, डॉ. सुधाकर लटपटे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर बोरगाव तारु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, दोन बहीण असा परिवार आहे. शोध मोहिमे दरम्यान प्रशासनाचे कर्मचारी, सरपंच माधवराव हिवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.
गिरजा व पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रात खड्डे पडले आहेत. पात्रात उतरल्यानंतर पाणी असल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि संबंधित व्यक्ती वाहून जातो किंवा बुडून मयत होतो. मागील पंधरा दिवसांत या दोन्ही नदीपात्रात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दहा दिवसांपूर्वी तडेगाव येथील पूर्णा नदीच्या पाण्यात दोघे वाहून गेले होते. तर गतवर्षी केदारखेडा येथे वाळूच्या खड्ड्यात असलेल्या पाण्यात एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बोरगाव तारू येथील युवकालाही प्राण गमविण्याची वेळ आली आहे. अवैध वाळू उपशाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळेच हे बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.