रूग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर पोलिस कोठडीत
By विजय मुंडे | Published: June 10, 2023 06:29 PM2023-06-10T18:29:48+5:302023-06-10T18:31:10+5:30
तपासणीदरम्यान डाॅक्टरकडे वैद्यकीय शिक्षण झाल्याचे प्रमाणपत्र व वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतचा परवाना नसल्याचे दिसून आले.
बदनापूर : वैद्यकीय शिक्षण प्रमाणपत्र, वैद्यकीय व्यवसाय परवाना नसताना हिवरा राळा (ता.बदनापूर) येथील रूग्णांवर औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूद्ध प्रशासकीय पथकाने शुक्रवारी दुपारी कारवाई केली होती. रूग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या 'त्या' डॉक्टरला शनिवारी चंदनझिरा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे एक बंगाली बोगस डॉक्टर रुग्णांना सेवा देत असल्याची माहिती तालुका बोगस डॉक्टर शोध समितीच्या अध्यक्षा तथा गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांना मिळाली होती. या माहितीवरून ज्योती राठोड यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके, आरोग्य सहायक सुदेश वाठोरे, सेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सोळुंके, बीटचे पोलिस हवालदार बहुरे, ग्रामसेविका एस. के. आष्टीकर यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अचानक सदरील बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई केली.
तपासणीदरम्यान त्या डाॅक्टरकडे वैद्यकीय शिक्षण झाल्याचे प्रमाणपत्र व वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतचा परवाना नसल्याचे दिसून आले. पथकाने त्याच्याकडून विविध प्रकारचे इंजेक्शन, सलाईन, गोळ्या आदी औषधींचा साठा जप्त केला. या प्रकरणात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमन कैलास विश्वास (वय २४ रा. बोनगाव जि. उत्तर २४ परगना पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील बोगस डॉक्टरला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे पोनि. रामेश्वर खनाळ यांनी सांगितले.