नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड
By महेश गायकवाड | Published: June 10, 2023 02:28 PM2023-06-10T14:28:48+5:302023-06-10T14:29:26+5:30
गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने छापा मारून तब्बल २५० क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणांचा साठा जप्त केला.
- गणेश पंडित
केदारखेडा (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातील एका गोदामात बाजारातून विकत घेतलेले बियाणे नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये भरून तो बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात येत होते. या गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी छापा मारून तब्बल २५० क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणांचा साठा जप्त केला. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे खरेदीसाठी गर्दी करत आहेत. जालना जिल्ह्यात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढल्याने बाजारात विविध कंपन्यांचे बियाणेही दाखल झाले आहेत. सोयाबीन बियाण्याची वाढती मागणी पाहता काहींनी बोगस बियाणांचा धंदा सुरू केल्याचे समोर आले आहे. केदारखेडा -भोकरदन मुख्य रस्त्यावरील बरंजळा लोखंडे पाटीनजीक सोयगाव देवी शिवारातील एका गोदामात बाजारातून खरेदी करण्यात आलेले सोयाबीन नामांकित बियाणे कंपन्यांच्या बॅगमध्ये भरण्यात येत होते. हे बियाणे बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होते. याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यांनतर कृषी विभागाच्या पथकाने या गोदामावर धाड टाकली. यात तब्बल चारशे क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणे नामांकित कंपन्याच्या बॅगमध्ये भरण्यात आल्याचे आढळून आले. हे संपूर्ण सोयाबीन बियाणे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान पथक येताच गोदामातील मुख्य सूत्रधार पसार झाले. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी.आर. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी एस. व्ही. कराड, कृषी अधिकारी आर. एल. तांगडे, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, विस्तार अधिकारी काकडे, मंडळ कृषी अधिकारी रामदास भिसे, कृषी सहायक सुनील रोकडे, प्रभाकर पाबळे, ए. बी, भोंबे, प्रवीण भोपळे यांनी केली.
गोदाम शेतकी उत्पादक कंपनीचे
ज्या गोदामात हा काळाबाजार सुरू होता. ते गोदाम पूर्णा- केळना शेतकरी प्रोड्यूसर कंपनी अंतर्गत सुरू असल्याचे समजते. या गोदामात फुले संगम, बायडन आदी कंपन्याच्या पिशव्यात बाजारातील सोयाबीन भरण्यात येत होते. या बियाण्यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याचे आढळून आले. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार गोदामात अंदाजे २६५ क्विंटल बियाणे आढळून आले. तसेच सोयाबीनचे लहान-मोठे दाणे, माती मिश्रित रॉ मटेरियल आदी गंभीर बाबीही याठिकाणी आढळून आल्या.