ग्रंथदिंडीने ग्रंथमहोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:59 AM2018-03-27T00:59:52+5:302018-03-27T00:59:52+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली. यानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या गं्रथदिंडीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सकाळी ९.३० वाजता जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून ग्रंथदिंडीची सुरूवात करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी एम.एस. चौधरी, पी.एल. कवाणे, उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, रमेश तांगडे आदींची उपस्थिती होती. मोतीबागेपासून सुरू झालेल्या ग्रंथदिंंडीचा जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे समारोप झाला. यामध्ये मत्स्योदरी माध्यमिक विद्यालय, इंदेवाडी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय, नंदकिशोर सहानी विद्यालय, किनगावकर माध्यमिक विद्यालय, जालना उर्दू हास्कूल आदी शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथ दिंडीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या मत्स्योदरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गं्रथमहोत्सवानिमित्त जि.प. माध्यमिक शाळा येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जुन सहभाग घेतला. दुपारच्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा.डॉ. बसवराज कोरे व सोनवटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी साहित्यिक आपल्या भेटीला, तर २८ रोजी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ हेच गुरु व विज्ञाननिष्ठ समाज या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. महोत्सवासाठी उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, जिल्हा समन्वयक पी.के. शिंदे, मुख्याध्यापक कुंडलकर, राजेंद्र कायंदे, एस.एम. देशमुख, गौतम वाव्हळ, डॉ. सुहास सदावर्ते, डॉ. सुशील सूर्यवंशी, संतोष लिंगायत, जगत घुगे, कुंडलकर, संजय कायंदे, एम.एस. जोशी आदी परिश्रम घेत आहेत.