लहान मुलांचे लसीकरण, जेष्ठांना बूस्टर डोसच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे विनंती : राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 11:51 AM2021-11-23T11:51:02+5:302021-11-23T11:56:53+5:30
Rajesh Tope On Corona Vaccine: डिसेंबर अखेर राज्यातील सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट
जालना : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील १० ते २० वयोगटांतील एक हजारपेक्षा अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. ही बाब गंभीर असून, त्यांच्यापासून संसर्ग टाळण्यासाठी घरातील ज्येष्ठांना बूस्टर डोस आणि ११ ते १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणास परवानगी देण्याची विनंती ( Rajesh Tope On Corona Vaccine For childrens ) आपण केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील शाळा, महाविद्यालये उघडली आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली आहे. त्यातूनच त्यांना कोरोनाची बाधा झाली असावी असा अंदाज आहे. परंतु, असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे टोपे म्हणाले. या मुलांमध्ये खूप गंभीर अशी लक्षणे नसून, केवळ हीच लहान मुले घरातील ज्येष्ठांच्या संपर्कात येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. यासह ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. टास्क फोर्ससोबत या विषयावर चर्चा करून याची अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती कार्यक्रम हाती घेऊ, असेही टोपे म्हणाले.
राज्यात कोरोना आटोक्यात
दररोज सरासरी ५०० ते ८०० रुग्ण सापडत असल्याचे ते म्हणाले. डिसेंबर अखेर राज्यातील सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट असून, त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. त्यात केंद्राच्या हर घर दस्तक आणि मिशन कवच कुंडल यातून हे डोस दिले जात असल्याचे सांगण्यात आले.