दोघींनी टोचली २४ हजार नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:28+5:302021-07-27T04:31:28+5:30
जालना : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील ...
जालना : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील शंभरावर केंद्रांमधून लसीकरण केले जात आहे. या मोहिमेत जालना येथील महिला रूग्णालयाचे केंद्र अव्वल असून, या केंद्रावरील दोन परिचारिकांनी शनिवारपर्यंत तब्बल २४ हजार ५३० जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व ती तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून लसीकरणावर अधिकचा भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात दैनंदिन जवळपास शंभर केंद्रावर लसीचा पुरवठा करून पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. काही ठिकाणी वयोगटानुसार लसीकरण केले जात आहे. या केंद्रांमध्ये जालना शहरातील महिला रूग्णालयातील केंद्र अव्वल आहे. अधीक्षक डॉ. आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. केतन चव्हाण, डॉ. नारायण धुमाळ, औषध निर्माण अधिकारी मनिष जाधव, लसीकरणकर्त्या कुसुम सोळंके, सुनीता भाले, विलास शेलकर, श्रीकांत करडखेडे, डॉ. अक्रम, डॉ. तौर यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची टीम काम करीत आहे. या केंद्रावरील लसीकरणकर्त्या कुसुम सोळुंके, सुनीता भाले या दोघींनी शनिवारपर्यंत तब्बल २४ हजार ५३० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या केंद्रांवर अधिक लसीकरण
जिल्ह्यातील केवळ सहा केंद्रांवर शनिवारपर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये जिल्हा महिला रूग्णालय केंद्रावर २४ हजार ५३०, अंबड येथील मत्स्योदरी केंद्रावर १४ हजार १२९, भोकरदन येथील केंद्रावर १३ हजार २०३, जालना शहरातील पाणीवेस केंद्रावर १२ हजार ४५, परतूर येथील केंद्रावर ११ हजार ८२९, व्यंकटेश सेवाभावी ट्रस्टच्या केंद्रावर ११ हजार ३०५ जणांचे लसीकरण झाले आहे.
साडेचार लाख नागरिकांना पहिला डोस
जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखावर आहे. परंतु, शनिवारपर्यंत केवळ ४ लाख ६७ हजार ४०० जणांनी पहिला आणि १ लाख ११ हजार ३५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यात ३ लाख १० हजार ६७८ पुरूषांनी व २ लाख ६७ हजार ६८४ महिलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोट
कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून नागरिकांनी वेळेवर लसीकरण करून घ्यावे. लसीकरणानंतरही मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करावे.
मनीष जाधव, औषध निर्माण अधिकारी