अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी मुलाची सुधारगृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:15 PM2020-08-12T20:15:51+5:302020-08-12T20:17:21+5:30
पोलिसांनी सखोल तपास करून विधिसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
जालना : अमरावती येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी विधि संघर्षग्रस्त मुलाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याची रवानगी मुंबई येथील बाल सुधारगृहात करण्याचे आदेश बाल न्यायमंडळाचे अध्यक्ष वसंत यादव यांनी दिले.
सात वर्षीय अल्पवयीन मुलीला विधिसंघर्षग्रस्त मुलाने अमरावती येथून पळवून आणले. हिवताप व पायाच्या जखमेवर उपचार करण्यासाठी पीडित मुलीला मारहाण करून अत्याचार केला असल्याची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदरची बाब कदीम जालना पोलिसांना कळविली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीचे जबाब नोंदवून या प्रकरणात विधि संघर्षग्रस्त मुलाविरूद्ध फिर्याद नोंदविली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून आणणे, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे या गुन्ह्यासाठी कलम ३७६ (२), (१), ३७६ (२), ३६३, ३६६-अ सह कलम ४, ८ बाललैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड यांनी सखोल तपास करून विधिसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात पीडित मुलीचे जबाब पोलिसांनी नोंदविला. एकूणच युक्तिवाद ऐकल्यानंतर विधिसंघर्षग्रस्त मुलाविरूद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने ३७६ (२), ०९. ३६३, ३६६ अ भादंवि अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने विधिसंघर्षग्रस्त मुलाची रवानगी मुंबई येथे करण्याचे आदेश जालना येथील बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष वसंत यादव यांनी दिले. या प्रकरणात अॅड. राजकमल ओव्हळ, रमेश जोगदंड यांनी सहकार्य केले.