रोहयोच्या कामावर बहिष्कार बीडीओ साहेबांचा, उपासमार १६ हजार मजुरांची

By विजय मुंडे  | Published: April 27, 2023 07:40 PM2023-04-27T19:40:18+5:302023-04-27T19:40:38+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची १,२१५ कामे ठप्प; लाभार्थी शेतकऱ्यांचीही गैरसोय

Boycott of MGNREGA's work by BDO, hunger of 16 thousand laborers | रोहयोच्या कामावर बहिष्कार बीडीओ साहेबांचा, उपासमार १६ हजार मजुरांची

रोहयोच्या कामावर बहिष्कार बीडीओ साहेबांचा, उपासमार १६ हजार मजुरांची

googlenewsNext

जालना : शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील अनेक जबाबदाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकल्या आहेत. याला विरोध दर्शवित जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी रोहयोच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, जिल्ह्यात सुरू असलेली १,२१५ कामे ठप्प झाली असून, १६ हजार १५७ मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रोहयोंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाकडून गावस्तरावर विविध कामे केली जात आहेत. अंबड तालुका वगळता इतर सात तालुक्यांतील २३९ ग्रामपंचायतींतर्गत जवळपास १,२१५ कामे रोहयोंतर्गत सुरू होती. त्यात सिंचन विहिरींची कामे, सार्वजनिक विहिरींची कामे, मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे, शोषखड्ड्यांची कामे, बांधावर वृक्षलागवड, शेततळे यासह इतर अनेक कामे राेहयोंतर्गत सुरू होती. या कामांवर १६,१५७ मजूर कार्यरत होते; परंतु, शासनाने रोहयोंतर्गत कामातील जबाबदारीत बदल केले आहेत. ग्रामपंचायतस्तरावरील साप्ताहिक हजेरी यापूर्वी रोजगार सेवक करीत होता. त्यावर ग्रामसेवक प्रतिस्वाक्षरी करीत होते. आता मात्र रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करताना कुशल व अकुशल कामांचे ६०:४० प्रमाण राखण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

रोजगार सेवक घेत असलेल्या हजेरीपत्रकावर प्रतिस्वाक्षरी करावी लागणार आहे; परंतु ग्रामपंचायतस्तरावर यंत्रणा असतानाही ही जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांवरच बहिष्कार टाकला आहे. तालुक्यातील सर्व कामांवर लक्ष ठेवताना गटविकास अधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. यासह इतर विविध कारणे देत गटविकास अधिकाऱ्यांनी रोहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, जिल्ह्यातील २३९ ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेली १,२१५ कामे बंद पडली आहेत. तर या कामांवर कार्यरत १६ हजार १५७ मजुरांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, राज्यस्तरीय संघटनेच्या निर्देशानुसार कामांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे एका गटविकास अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मजूर म्हणतात...
रोहयोंतर्गत खोराड सावंगी येथे पाणंद रस्त्याचे काम सुरू आहे. १३ ते १८ एप्रिलदरम्यान १०५ मजूर होते. मस्टर काढल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे पैसे मिळालेले नाहीत. हा बहिष्कार मागे घ्यावा. तातडीने मजुरी देण्यासह मजुरांच्या हाताला कामे द्यावीत.
- तुकाराम राठोड, खोराड सावंगी

उपासमारीची वेळ 
माझ्या कुटुंबात दोन मुले लहान आहेत. मी व पत्नी आम्ही दोघेही रोजगार हमी योजनेचे काम करतो. काम सुरू झाल्यावर अधिकारी संपावर गेले. आम्ही पाणंद रस्त्यावर चार दिवस काम केले. काम करूनही मजुरी मिळाली नाही. हाताला काम नसल्याने, मजुरी मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
- राम मांगीलाल चव्हाण, मजूर

Web Title: Boycott of MGNREGA's work by BDO, hunger of 16 thousand laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.