संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन असल्याची संधी साधत जालन्यात धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:23 PM2020-06-23T16:23:29+5:302020-06-23T16:24:16+5:30
आ. कैलास गोरंट्याल यांचे पीए मोहन अबोलेंचे घर फोडले
जालना : वयोवृध्द आईला कोरोनाची लागण झाल्याने मोहन अबोले यांच्या सर्व कुटुंबाला एका खाजगी हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. ही संधी साधून त्यांच्या नवीन जालन्यातील कादराबाद भागातील रंगारगल्लीतील घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. त्यात साडेचार ते पाच लाख रूपयांचे बारा तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केल्याची माहिती अबोले यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे.
गेल्या आठवड्यात कदराबाद भागातील आ. कैलास गोरंट्याल यांचे खाजगी स्वीय सहायक म्हणून मंत्रालयात काम करणारे मोहन अबोले यांच्या वृध्द आईला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांच्या सर्व परिवाराला येथील प्रशासनाने क्वारंटाइन केले. मोहन अबोल यांच्या सुनेला नऊ महिन्यांचा लहान मुलगा आहे, त्यामुळे त्या मुलाच्या वडिलांना आणि मुलाच्या पत्नीला घरी राहू द्यावे आम्ही अन्य सर्वजण क्वारंटइन होतो, असे अबोले यांनी विनंती केली होती. परंतु, ती विनंती यंत्रणेने फेटाळून लावली. त्यांना जालन्यातील एका खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी अबोले यांना शेजाऱ्यांनी फोनवरून तुमचे घर चोरट्यांनी फोडल्याची माहिती दिली. अबोले यांनी तातडीने घरी धाव घेऊन पाहिले असता, कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच आई आणि पत्नीच्या कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम ४० ते ५० हजार रूपये चोरीस गेल्याचे अबोले यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच सदरबाजार पोलिसांना याची माहिती देऊन तक्रार नोंदविली आहे. या घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख व अन्य अधिकाऱ्यांनी अबोले यांच्या घरी जाऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकालाही पाचारण केले होते.परंतु अद्याप पर्यंत या चोरीतील आरोपी हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाचे कागदी घोडे
आमदारांच्या स्वीय सहायकासह त्यांच्या परिवाराला आठ दिवसांपूर्वी क्वारटांइन करण्यात आले होते. त्यांना ज्या खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे एकदाही कुठला अधिकारी अथवा डॉक्टर फिरकला नाही. तसेच क्वारंटाइनचे शिक्केही त्यांच्या हातावर मारले नाहीत. विशेष म्हणजे त्या हॉटेलमध्ये कोण येतोय - कोण जातोय याची नोंदही नाही. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आनुभव खुद्द मोहन अबोले यांनी बोलून दाखविल्याने प्रशासन कोरोनाबाबत किती सतर्क आहे, हेच यातून दिसून येत आहे.