जागेअभावी तूर खरेदीला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:34 AM2018-03-13T00:34:39+5:302018-03-13T00:34:53+5:30
शासकीय गोदामात तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने सोमवारी हमीभाव केंद्रावर तूर खरेदी ठप्प होती. आता तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिका-यांनी तूर ठेवण्यासाठी गोदामाचा शोध सुरू केला आहे. यामुळे तूर खरेदीबाबत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासकीय गोदामात तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने सोमवारी हमीभाव केंद्रावर तूर खरेदी ठप्प होती. आता तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाच्या अधिका-यांनी तूर ठेवण्यासाठी गोदामाचा शोध सुरू केला आहे. यामुळे तूर खरेदीबाबत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
गेल्या वर्षी नाफेडने जिल्ह्यात पाच टप्प्यात १ लाख ७३ हजार क्विंटल तूर हमीभावाने खरेदी केली होती. यामुळे शासकीय गोदाम तुरीने भरले आहेत. हीच परिस्थिती राज्यभर असल्याने तुरीची विल्हेवाट कशी लावावी असा प्रश्न जिल्हा मार्र्केटिंग विभागाला पडला आहे. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, आष्टी, वडीगोद्री इ. ठिकाणी असलेल्या शासकीय वेअर हाऊसमध्ये अद्यापही १ लाख ४० हजार क्विंटल तूर पडून आहे. त्यातच जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर आत्तापर्यंत खरेदी करण्यात आलेली १० हजार क्विंटल तुरीची त्यात भर पडली आहे. खरेदी केलेली तूर सिटी वेटर हाऊसमध्ये ठेवण्यात येत होती. मात्र त्यात जागाच शिल्लक नाही. यामुळे काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात तूर ठेवण्यात येत आहे. मात्र, या गोदामात आधीच शेतमाला तारण योजनेतील सोयाबीन, तूर, हरभरा इ. शेतमाल ठेवलेला आहे. गोदामाची क्षमता संपत आली आहे. जागेअभावी खरेदी केलेली तूर चोरी होण्याची भीती असल्याने तूर खरेदी थांबविण्याच्या सूचना जिल्हा मार्केटिंग विभागाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. साडेपाच हजारपेक्षा जास्त शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
मात्र, आतापर्यंत दीड हजार शेतक-यांची हमीभावाने तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांना खरेदीबाबत प्रतीक्षा लागून आहे.