काँग्रेससाेबतची युती तोडून दाखवाच; बबनराव लोणीकरांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
By महेश गायकवाड | Published: March 30, 2023 06:31 PM2023-03-30T18:31:33+5:302023-03-30T18:33:21+5:30
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून भाजप व शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.
परतूर : स्वातंत्र्य लढ्यातील वीर सावरकर यांच्या कार्याचा अभ्यास न करता त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य राष्ट्रीय पक्षाचे नेते करीत आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे. उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबतची युती ताेडून दाखवावी. असे आव्हान भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची युवा पिढीला ओळख व्हावी, या उद्देशाने भाजपाच्यावतीने राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेविषयी माहिती देण्यासाठी परतूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अवमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती. असे सांगत राहुल गांधी व काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. हा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबतची युती उद्धव ठाकरेंनी तोडून दाखवावीच, असे आव्हान बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिले. या पत्रकार परिषदेस भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमोचे संपत टकले, माऊली कोंडके, विलास घोडके, सतीश बोराडे यांची उपस्थिती होती.
२८८ मतदारसंघात निघणार सावरकर गौरव यात्रा
नव्या पिढीला सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप व शिवसेनेतर्फे ही यात्रा काढण्यात आली आहे. ३० मार्चपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी परतूर शहरात ही यात्रा काढण्यात येणार आहे. तर ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार असल्याचे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.