२०० युवक सादर करणार चित्तथरारक प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:32 AM2019-07-12T00:32:04+5:302019-07-12T00:32:49+5:30
आषाढी एकादशीनिमित्त शहरातून निघणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत २०० मुलं-मुली काठी, मल्लखांब, लेझीमसह इतर थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरातून निघणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत २०० मुलं-मुली काठी, मल्लखांब, लेझीमसह इतर थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करणार आहेत. जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने मागील ४० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ही परंपरा आजही कायम आहे.
मुलांनी व्यसनाच्या आहारी न जाता व्यायामाकडे वळावे, क्रीडा क्षेत्रात विशेषत: कुस्तीचे फड गाजविणारे मल्ल शहरात तयार व्हावेत, यासाठी जालना येथील स्व. रावसाहेब पहेलवान सुपारकर यांनी साधारणत: ४० ते ४५ वर्षांपूर्वी जय बजरंग तालीम मंडळाची स्थापना केली. मोजक्या मुलांना त्यांनी कुस्तीचे धडे देण्यास सुरूवात केली. पाहता-पाहता सुपारकर यांच्याकडे कुस्तीचे धडे घेण्यासाठी येणाºया युवकांच्या संख्येत वाढ होऊ लागली. शहरातील इतर मुलांनाही व्यायामाकडे, क्रीडा क्षेत्राकडे वळावे यासाठी सुपारकर यांनी शहराचे कुलदैवत असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत मुलांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यास सुरूवात केली. मागील साधारणत: ४० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. आषाढी एकादशीनिमित्त निघणा-या श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत यंदाही २०० मुलं-मुली काठी फिरविणे, लेझीम, टिप-या, करेले फिरविणे, मल्लखांब इ. प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. जय बजरंग तालीम मंडळ व जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मार्गदर्शनाखाली एका महिन्यापासून ही मुले-मुली प्रशिक्षण घेत आहेत.
श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणुकीत प्रात्यक्षिक सादर करणारे मुले-मुली बीड, देऊळगाव राजासह इतर ठिकाणी होणा-या शिवजयंतीसह इतर मिरवणुकांमध्ये प्रात्यक्षिक सादर करून मुला-मुलींना व्यसनापासून दूर राहून व्यायामाकडे वळण्याचा संदेश देत आहेत.