औट घटकेची वधू चतुर्भुज; पतीला ३० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:24 IST2020-01-10T01:24:27+5:302020-01-10T01:24:44+5:30
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लग्न केलेल्या नवरदेवाला सात दिवस संसार करणाऱ्या पत्नीने ३० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार जालना येथे समोर आला आहे

औट घटकेची वधू चतुर्भुज; पतीला ३० हजारांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लग्न केलेल्या नवरदेवाला सात दिवस संसार करणाऱ्या पत्नीने ३० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार जालना येथे समोर आला आहे. पत्नीची चलबिचल पाहून पती पोलिसांत गेला आणि पत्नी म्हणून जिच्याशी लग्न केले ती व तिचे साथीदार वन-डे लग्नाचा बनाव करून अनेकांना गंडवित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चंदनझिरा (जालना) पोलिसांनी त्या दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. ही घटना तालुक्यातील निधोना येथे १ ते ८ जानेवारी या कालावधीत घडली.
निधोना येथील एक व्यक्ती गत अनेक वर्षांपासून लग्नासाठी मुलगी पाहत होता. १ जानेवारी २०२० रोजी राजू पवार नामक व्यक्ती दोन महिला व त्यांच्या मामासह त्या व्यक्तीच्या घरी आले होते. लग्नाचा विषय काढून ‘मुलगी पसंत असेल तर तिच्या आईची तब्येत खराब आहे. वन-डे लग्न करून घ्या. लग्नाचे फोटो तिच्या आईला दाखवायचे आहेत’ अशी विनंती करून लग्न लावले. लग्नानंतर मुलगी काही ना काही कारण काढून घरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे नवरदेवाच्या लक्षात आले. त्यानंतर आईच्या दवाखान्यासाठी पैशाची गरज दाखवून ३० हजार रूपये नातेवाईकांनी नेले. नवरी घरीच होती.
सात दिवसांच्या संसारात मुलगी घरातून निघून जाण्याचा प्रयत्न करीत होती. ही बाब लक्षात येताच पतीने ८ जानेवारी रोजी चंदनझिरा पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. पोनि शामसुंदर कौठाळे यांनी नवरीला बोलावून घेत महिला कर्मचाऱ्यांमार्फत तिची चौकशी केली. त्यावेळी त्या मुलीने वन-डे लग्नाचा बनाव करून संबंधितांची ३० हजार रूपयांना फसवणूक केल्याची कबुली दिली. या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पथकाने मानवत (जि.परभणी) येथे कारवाई करून कचरूलाल तुलशीराम निलपत्रेवार याच्यासह एका महिलेला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून २० हजार रूपये जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडले, पोहेकॉ वाघमारे, पोकॉ नंदलाल ठाकूर, महिला कर्मचारी शारदा गायकवाड यांच्या पथकाने केली.
मुलीचे झाले होते लग्न
निधोना येथील व्यक्तीसोबत लग्न केलेल्या मुलीचे काही वर्षापूर्वी मुंबई येथील एका व्यक्तीशी लग्न झाले होते. तिला दोन मुले आहेत. मात्र, ती पतीसोबत राहत नव्हती. त्यामुळे तिचे तक्रारदाराशी लग्न लावून पैसे घेऊन आम्ही पळून जाणार होतो, अशी माहिती निलपत्रेवार याने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली आहे.
खोट्या लग्नाचा बनाव करून फसविणारी टोळी
परभणी जिल्ह्यात खोट्या लग्नाचा बनाव करून फसविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे अटकेतील तिघांविरूध्द इतर कोठे गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पो.नि. शामसुंदर कौठाळे यांनी दिली.