राष्ट्रीय महामार्गावर ‘पूल कम बंधारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:35 PM2018-01-07T23:35:10+5:302018-01-07T23:35:42+5:30
जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या नवीन राष्ट्रीय महामार्गांवर 'पूल कम बंधारा' उभारणीच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.
जालना: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागांतर्गत जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या नवीन राष्ट्रीय महामार्गांवर 'पूल कम बंधारा' उभारणीच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक तथा जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.
लोणीकर यांनी रविवारी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते कामांबाबत चर्चा केली. जिल्ह्यात नवीन राष्ट्रीय महामार्गांवर 'पूल कम बंधारा' (पूल हाच बंधारा) ही योजना राबविण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली. या बंधा-यांमुळे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसाठी होणार आहे. मंठा तालुक्यातील वाटूर फाटा ते देवगाव फाटा या २० किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडून राज्याचे रस्ते विकास मंडळाकडे वर्ग करावे, या मागणीला गडकरी यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री गडकरी यांनी आवश्यक तिथे तेथे पुलांचे कामातील खर्चाच्या अंदाजपत्रकातील दहा टक्के रक्कम बंधा-यांच्या कामांसाठी खर्च करण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे लोणीकर यांनी सांगितले. निम्न दुधना दुधना प्रकल्पाचे काम पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत सुरू आहे. सन २०१६ मध्ये हा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पातील पाणी परिसरातील १९० हेक्टर क्षेत्रावरील शेतक-यांच्या शेतात गेले. त्यामुळे संबंधित शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. भविष्यात असे नुकसान होऊ नये यासाठी या परिसरातील अतिरिक्त भूसंपादनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी केंद्रीय जलसंपदा मंत्र्याकडे करण्यात आली. महामार्गांवरील पुलांखाली बंधारे उभारणीमुळे या भागातील भूजल पातळी वाढेल तसेच पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे लोणीकर यांनी सांगितले.
--------------
या मार्गावर होणार पूल कम बंधारे
जिल्ह्यातून जाणा-या जालना-वाटूर-मंठा-जिंतूर-बोरझरी-परभणी, शहागड-वडीगोद्री-अंबड-जालना, शेगाव-लोणार-मंठा-वाटूर-परतूर-आष्टी-लोणी-माजलगाव-धारूर-केज-कळंब-बार्शी-कुडूर्वाडी-पंढरपूर या रस्त्यावर अशा पद्धतीचे बंधारे होणार आहेत.