बीएसएनएलचे २ कोटी रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:49 AM2018-12-28T00:49:14+5:302018-12-28T00:50:00+5:30
रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत नगरपालिकेला ८० लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, नगरपालिकेने अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही.
जालना शहरातील सर्वच रस्ते नव्याने तयार करण्यात आले. यात कचेरी रोड, बसस्थानक रोड, बडी सडक, शिवाजी पुतळा, भोकरदन नाका यासह आदी रस्ते तयार करण्यात आले. तर काही रस्त्यांची कामे सुरु आहेत.
हे रस्ते तयार करतांना खोल पर्यंत खोदावे लागत असल्याने १ मीटर खोलवर असलेल्या टेलीकॉम कंपन्याचे वायर तोडतात. याचा फटका टेलिकॉम कंपन्या बसत आहे. तसेच शहरातील नळ जोडणी, पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी खोदण्यात येणा-या खड्ड्यांमुळे बीएसएनएल या कंपनीला कोट्यांवधींचा फटका बसला आहे. यामुळे मागील दीड वर्षात १५००० लॅण्डलाईन बंद पडले असून, कंपनीला २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.यामुळे शहरतील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला.
जालना शहरात सर्वच रस्त्यांची कामे झाले आहे. तसेच अनेकवेळा पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्ते खोदण्यात येते. यामुळे टेलीकॉम कंपन्यांची वायर तुटल्या जातात. दरम्यान, नगरपालिकेच्या हद्दी झालेल्या कामांची नुकसान भरपाई नगरपालिकेने देणे बंधनकारक आहे. यासाठी नगरपालिकेकडे ८० लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु, नगरपालिकेने अद्यापही नुकसान भरपाई दिली नसल्याचे बीएसएनएलच्या अधिका-यांनी सांगितले.