पोळ्याच्या मिरवणुकीला काही तास बाकी असतानाच सर्जाराजाचा करुण अंत; शेतकऱ्याचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:24 PM2022-08-26T17:24:14+5:302022-08-26T17:25:01+5:30
आपल्या डोळ्यासमोर लाडक्या बैलजोडीचा अंत झाल्याने शेतकऱ्याने खदाणीत टाहो फोडला होता.
- दिगंबर गुजर
कुंभार पिंपळगाव (जि.जालना): धन्याच्या शेतात वर्षभर राबलेल्या जोडीला सजवून गावभर मिरवण्याची वेळ जवळ येत असताना घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या दोन्ही बैलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी अंत झाला. विशेष बाब म्हणजे शेतकरी या बैलांना धुण्यासाठी या खदाणीत घेऊन आला होता. पाेळा सण साजरा करण्यासाठी काही तास उरलेले असताना डोळ्यासमोर बैलजोडीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याने जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने टाहो फोडला होता.
घनसावंगी तालुक्यातील घोंशी बु. येथे ही दुखद घटना घडली. येथील शेतकरी सीताराम आव्हाड हे पोळ्यासाठी आपल्या बैलजोडीला सजवण्याआधी त्यांना धुण्यासाठी गावालगत असलेल्या खदाणीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास घेऊन गेले होते. घोंशी गावापासून ही खदाण एक किलोमीटर अंतरावर होती. दोन्ही बैल पाण्यात उतरल्यानंतर त्यातील एका बैलाच्या पायात कासरा अडकल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी सीताराम आव्हाड यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणी मदतीला येईपर्यंत त्यांच्या दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
आपल्या डोळ्यासमोर लाडक्या बैलजोडीचा अंत झाल्याने शेतकऱ्याने खदाणीत टाहो फोडला होता. आपल्या सर्जा-राजाची जल्लोषात मिरवणूक काढण्याऐवजी त्यांना शेवटाचा निरोप देण्याची वेळ शेतकरी आव्हाड यांच्यावर आल्याने त्यांना दु:ख अनावर झाले होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बैल जोडीचा होता कुटुंबाला आधार
शेतकरी सीताराम आव्हाड यांना दोन एकर जमीन आहे. या बैलजोडीच्या मदतीने ते आपल्या शेतीबरोबरच दुसऱ्याच्या शेताची मशागत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु, दोन्ही बैलाच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.