पीआरकार्ड नसतानाही बांधले बंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:04 AM2018-05-25T01:04:41+5:302018-05-25T01:04:41+5:30
हातील शिवनगर समोरील भागात सर्व्हे क्रमांक ४९२ चा मोठा परिसर आहे. या परिसरातील नागरिकांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी जागा खरेदीकरून त्यावर मोठमोठी घरे बांधली आहेत. मात्र, या नागरिकांकडे भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येणारे पीआरकार्ड नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहातील शिवनगर समोरील भागात सर्व्हे क्रमांक ४९२ चा मोठा परिसर आहे. या परिसरातील नागरिकांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी जागा खरेदीकरून त्यावर मोठमोठी घरे बांधली आहेत. मात्र, या नागरिकांकडे भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येणारे पीआरकार्ड नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. या भागात मंजूर झालेला डांबरी रस्ताही संबंधित कंत्राटदार बिल निघेल की, नाही यामुळे तो पूर्ण करत नसल्याचे वास्तव आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी शहरातील या अत्यंत महत्वाच्या भागात अनेकांनी केवळ बाँडवर जागा खरेदी करून त्यावर घरे बांधली आहेत. या भागातील नागरिकांनी यापूर्वीही पीआरकार्ड मिळावे म्हणून भूमिअभिलेख तसेच नगररचना कारांकडे अर्ज दिले आहेत. मात्र, त्याची दखल न घेतल्याने एवढी गुंतवणूक करून बांधलेली घरे जर अडचणीत येत असतील ही बाब गंभीर आहे. विशेष म्हणजे जालना पालिका देखील या नागरिकांकडून अद्याप मालमत्ता करही वसूल करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदनही दिले आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
या संदर्भात येथील नगररचानाकार पवार यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, ज्या जागेवर या नागरिकांनी घरे बांधली आहेत, ती जागा सरकारी असावी, तसेच जर ती तशी असेल तर या नागरिकांनी महसूल विभागाकडून ती नियमाकुल करून घेऊन जो दंड आहे, तो भरल्यावरच ही जागा नियमित होईल. त्यानंतर त्याची नोंद जालना पालिकेकडे होऊन त्यांना घरबांधणीची परवानगी घेतल्यावरच पीआरकार्ड मिळू शकतील. त्यासाठी त्यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे.