नाथबाबा गल्लीत घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:13 AM2020-02-07T01:13:21+5:302020-02-07T01:13:49+5:30
शहरातील नाथबाबा गल्ली भागात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ५० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील नाथबाबा गल्ली भागात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ५० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना ४ ते ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ पूर्वी घडली. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची तपासणी केली.
शहरातील नाथबाबा गल्ली भागात राहणारे पवन जैस्वाल हे ४ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. जैस्वाल यांच्या घराचे कुलूप तुटल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पाहिले. ही घटना समजताच पवन जैस्वाल यांचे चुलत बंधू सुरेंद्र सुरेशकुमार जैस्वाल यांनी सदरबाजार पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम ४ लाख ५० हजार रूपये, सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केल्याचे समोर आले. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचरण करण्यात आले होते. या प्रकरणी सुरेंद्र जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि नागवे हे करीत आहेत.