नूतन वसाहत येथे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:29 IST2020-01-22T00:29:14+5:302020-01-22T00:29:38+5:30
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ सोमवारी रात्री घडली.

नूतन वसाहत येथे घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ सोमवारी रात्री घडली. यात सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा २ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
नूतन वसाहत येथील रहिवासी एकनाथ गणपत पाटेकर (६५) हे सोमवारी दुपारी परिवारासह कडेगाव येथे गेले होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेजारी राहणारे सोनटक्के यांनी फोनवरून घराचे दोन्ही दरवाज्याचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे सांगितले. माहिती मिळताच ते परिवारासह घरी आले. गेटचे व दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे त्यांना दिसले. घरात जाऊन पाहिले असता, कपाटाचे दार उघडून सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५५ हजार रूपये चोरट्यांनी चोरून नेले. यात २७ हजाराची ठुशी, ८१ हजाराचे गंठण, १३५०० रूपयांचे कानातले डूल, १३५०० रूपयांची सोन्याची चेन, २७ हजारांचे कानातली फुले, असा २ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
गुन्हा दाखल : तपासासाठी पथक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक बनसोड, कर्मचारी खार्डे हे करीत आहेत. एकनाथ गणपत पाटेकर यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नूतन वसाहतमध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. यापूर्वीही अनेक चोऱ्या आणि मोटारसायकल तसेच कार लांबविण्याचे प्रकार घडले होते. त्या तपासाचेही मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.