खोडसाळपणातून गंजी पेटवली; ५ लाखांचा चारा जळून खाक, जनावरे बालंबाल बचावली
By शिवाजी कदम | Published: June 15, 2023 05:23 PM2023-06-15T17:23:49+5:302023-06-15T17:24:37+5:30
तपोवन शिवारात यापूर्वीही जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
राजुर: भोकरदन तालुक्यातील तपोवन येथे ओंकार कढवणे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत चाऱ्याच्या गंजीस आग लावून पसार झाल्याची घटना बुधवार 14 जून रोजी रात्री घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग लावणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शेजारीच असलेली जनावरे बालबाल बचावली आहेत.
तपोवन येथील शेतकरी ओंकार कढवणे यांनी शेतातील बखारीत जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा साठवून ठेवला होता. यामध्ये पाच ट्रॅक्टर भूसा आणि ७५० कडब्यांच्या पेंढ्या होत्या. परंतु अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणातून चारा गंजीस आग लावली. या घटनेत शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
बखारी शेजारी राहणारे ज्ञानेश्वर कढवणे हे रात्री ११च्या सुमारास उठले असता त्यांना चाऱ्याची गंजी पेटल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ओंकार कढवणे यांना ही माहिती दिली. ओंकार कढवणे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत संपूर्ण चाऱ्याची गंजी जळून खाक झाली होती. आगीमुळे सभोवतालची झाडे होरपळून निघाली.कडबा गंजीच्या बाजूला गोठयात जनावरें बांधलेली होती.सुदैवाने आग तिकडे पोचली नाही यामुळे ती बचावली. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.वैशाली पवार करीत आहे.
यापूर्वीही अनेक घटना
तपोवन शिवारात यापूर्वीही जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ओंकार कढवणे यांचे ठिंबक सिंचनचे साहित्य पेटवून दिले होते. तसेच रामनाथ मालुसरे आणि राजेंद्र मालुसरे यांचे शेडनेट अज्ञात व्यक्तीने जाळून टाकले. विश्वंभर मालुसरे या शेतकऱ्याची सोयाबीनची गंजी पेटून दिली होती. त्यामुळे तपोवन शिवारात जाळपोळीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.