कसुरा नदीत बस कोसळली : २५ प्रवासी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:51+5:302021-09-24T04:35:51+5:30
परतूर : चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने २५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पाण्यात कोसळल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील ...
परतूर : चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने २५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पाण्यात कोसळल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदीवर गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी धाव घेऊन २५ प्रवाशांना वाचविले आहे.
परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे. यातच गुरुवारी रात्री परतूर आगाराची (एमएच.१४.बीटी.२२८०) ही बस परतूरहून २३ प्रवासी घेऊन आष्टीकडे जात होती. या बसमध्ये दोन लहान मुलांसह २३ प्रवासी व चालक, वाहक असे एकूण २५ प्रवासी होते. श्रीष्टी गावाजवळ कसुरा प्रकल्प आहे. सध्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. कसुरा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात आहे. अशात बसचालकाने बस पाण्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने बस नदीपात्रात कोसळली. ही बाब कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बसच्या काचा फोडून सर्व प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले.
यांनी वाचविला प्रवाशांचा जीव
बस पाण्यात पडल्याचे कळताच, सरपंच प्रमोद अंभोरे, कल्याण अंभोरे, सोमेश्वर नवल, योगेश नवल, भरत मुळे, गणेश नवल, सर्जेराव अंभोरे, पवन सरकटे, बालू तिखे, महादेव अंभोरे, जगन्नाथ अंभोरे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. घटनास्थळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब तेलगड, सरपंच शत्रुघ्न कणसे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, वैद्यकीय अधीक्षक बी. आर. नवल, आगारप्रमुख दिगंबर जाधव, पोनि. श्यामसुंदर कौठाळे यांची उपस्थिती होती.
चालक-वाहक फरार
संतप्त प्रवासी व ग्रामस्थांनी चालक-वाहकाचा शोध घेतला, मात्र ते दोघे घटनास्थळाहून पसार झाले होते. पाण्याचा प्रवाह वाढलेला असतानाही बस पाण्यात का घातली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.