चोरीचे सोयाबीन विकून केला कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:32 AM2021-01-25T04:32:14+5:302021-01-25T04:32:14+5:30
दोन आयशरसह आरोपी अटकेत : परतूर पोलिसांची कारवाई परतूर : येथील एका व्यापाऱ्याच्या दोनशे क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री करून ...
दोन आयशरसह आरोपी अटकेत : परतूर पोलिसांची कारवाई
परतूर : येथील एका व्यापाऱ्याच्या दोनशे क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री करून त्यातून आलेल्या पैशांतून कापूस खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. पोलिसांनी एकास दोन आयशरासह चारठाणा (ता. जिंतूर) येथून रविवारी ताब्यात घेतले. राजेखॉ पठाण (रा. चारठाणा, ता. जिंतूर, जि. परभणी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
परतूर शहरातील व्यापारी दिनेश होलाणी यांनी धुळे येथील व्यापाऱ्याला दोनशे क्विंटल सोयाबीन एका ट्रकद्वारे पाठविली होती. मात्र, ट्रकचालक भीमा कांबळे हा येथे गेलाच नाही. होलाणी यांनी ट्रकमालक सय्यद कैसर सय्यद अख्तर याच्याशी संपर्क केला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी दिनेश होलाणी यांनी ९ लाख ४९ हजार रुपयांचे सोयाबीन चोरीला गेल्याची तक्रार ३० डिसेंबर रोजी परतूर पोलीस ठाण्यात दिली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सदरील गुन्ह्यातील आरोपी हा चारठाणा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून चारठाणा येथून राजेखॉ पठाण याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने साथीदारांच्या मदतीने सोयाबीन ट्रकमधून दोन आयशरमध्ये टाकली. त्यानंतर सदरील सोयाबीन विकून कापूस खरेदी केला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून दोन आयशर ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत. पुढील तपास सपोनि. रवींद्र ठाकरे हे करीत आहेत. ही कारवाई सपोनि. रवींद्र ठाकरे, कॉन्स्टेबल गणेश शिंदे, आबासाहेब बनसोडे, दशरथ गोबणवार यांनी केली.
फोटो
परतूर पोलिसांनी सोयाबीन चोरी प्रकरणातील जप्त केलेले आयशर.