मंत्र्यांच्या मतदारसंघातच पीकविमा वाटपात गोंधळ -कैलास गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 01:08 AM2019-09-12T01:08:05+5:302019-09-12T01:08:52+5:30
कर आकारणीच्या मुद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचा दावा गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पालिकेच्या मुद्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी घेतलेला पवित्रा हा हास्यास्पद आहे. कर आकारणीच्या मुद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचा दावा गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या मतदारसंघात पीकविमा वाटप रखडल्याचे सांगून त्यांनी शहरात साडेचार वर्षात औरंगाबाद चौफुली ते विशाल कॉर्नर या एकमेव रस्त्याचे काम केल्याचेही गोरंट्याल यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे राज्यमंत्री खोतकर तसेच उपनगराध्यक्ष राऊत यांच्याकडून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. ही बाब चिंतेचा विषय आहे. त्यांनी कुठल्याही चौकशी केल्या तरी त्यांना त्यात काहीच हाती लागणार नाही, अंदाज समितीचा अहवाल त्यांनी जनतेसमोर मांडवा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कर आकारणीची कोलेब्रो कंपनीची नियुक्ती ही शिवसेना -भाजप युतीच्या ताब्यात पालिका असतानाच करण्यात आली होती. असा दावा करून त्याला आम्ही मुदतवाढ दिली. पालिकेचे उपत्न वाढीचे स्त्रोत हे कर आणि पाणी पट्टी आकारणी हेच असल्याने ते काळानुरूप वाढविणे गरजेचे असल्यानेच आम्ही हा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निर्णयाची कल्पना आम्हाला नव्हती हे देखील गोरंट्याल यांनी मान्य केले.
एकूणच गणेश विसर्जनच्या मुद्यावरून ही पत्र परिषद थेट खोतकर आणि राऊत यांच्या भोवती फिरली. यावेळी आपण अनेक गावात फ्रिलो असता, शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. पीकविमा, पीककर्ज हे अद्यापही अनेकांना मिळाले नाही. जालना तालुक्यात तर गेल्या रबी हंगामातील पीकविमाही वाटप झालेला नाही. याकडे राज्यमंत्र्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु तसे करता केवळ कामाच्या शुभारंभावर भर देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नाहीत, तसेच अन्य शासकीय विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. हे शासन म्हणून त्यांनी पाहणे आवश्यक असतसाना नोकरी मेळावा, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम घेऊन ते विकास कामे करत असल्याचे भासवत असल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शहराध्यक्ष शेख महेमूद, महावीर ढक्का आदींची उपस्थिती होती.
गुरूवारी होणा-या गणेश विसर्जनासाठी जालना पालिकेने योग्य ती तयारी केली आहे. यंदा नांदेड येथून ४० जणांचे विशेष पथक तराफ्यांसह तैनात करण्यात आले आहे. तसेच पट्टीचे पोहणारे तरूणही तेथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अग्निशमन दल, क्रेन तसेच घरगुती गणपती विसर्जनाची वेगळी व्यवस्था केली आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, मोठे क्रेन मागवण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले असून, विसर्जन स्थळावर १५ सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा