२ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 12:57 PM2024-02-10T12:57:15+5:302024-02-10T13:48:59+5:30
सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे.
मुंबई - नवी मुंबईतील वाशी येऊन शासकीय अध्यादेश घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे माघारी फिरले होते. आपल्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाची त्यांनी येथूनच सांगता करत विजयी जल्लोषही केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद सर्वांनी साजरा केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाशीत येऊन मनोज जरांगेंना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मात्र, मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे.
सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. या मागणीवर ठाम असून सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, असे आवाहन जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्याचवेळी, त्यांनी मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करा, अन्यथा पुन्हा १० फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, मनोज जरांगे यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे. सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवून सगेसोयरे शब्दाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे, अशी प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबईतील आंदोलन वाशीच्या मार्केट किमिटीतून स्थगित केल्यानंतर जरांगे यांनी आपलं गाव गाठलं होतं. मात्र, त्यानंतर लगेच ते ४ दिवसांच्या दौऱ्यावर निघाले होते. कामोठे, नवी मुंबई चेंबूर आणि आळंदी येथेही त्यांचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर, त्यांनी मुंबईत वकिलांसोबत बैठक घेऊन मराठा आंदोलकांसोबतही चर्चा केली. याचदरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी अध्यादेशा कायदा करा, अन्यथा १० फेब्रुवारीला उपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलं होंत. त्यानुसार, आज गोदा पट्ट्यातील मराठा समाजाची बैठक घेऊन जरांगे यांनी आपलं उपोषण सुरू केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील बऱ्याच प्रक्रिया सरकारकडून बाकी आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण असल्याचेही जरांगे-पाटील यांनी म्हटले. तसेच, आता एक इंचही आपण मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे हजारो मराठा बांधव जमले आहेत. राज्याच्या अनेक जिल्ह्यात जरांगे यांच्या उपोषणाला समर्तन देण्यासाठी एकत्र आले आहेत. यावेळी, काही मराठा बांधवांनी त्यांच्या उपोषणाला विरोध दर्शवला असून सरकारने मागणी पूर्ण करावी, असे म्हटले आहे. सातत्याने मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ देऊ नये, त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, असे म्हणत काही मराठा बांधवांनी उपोषण न करण्याची विनंती जरांगे यांना केली आहे.