नातेवाईकाला भेटण्यासाठी आला अन् पोलिसांनी बेड्या ठोकल्या; खुनातील आरोपी जेरबंद
By दिपक ढोले | Published: February 23, 2023 05:57 PM2023-02-23T17:57:44+5:302023-02-23T17:58:04+5:30
मध्य प्रदेशात राहायचा संशयित आरोपी, मोबाईल नसल्याने लागत नव्हता शोध
जालना : वर्षभरापूर्वी एका महिलेचा खून करून फरार झालेला आरोपी नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी त्याच्या मुसक्या जाफराबाद पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. संजय विजय मुळेकर (४२ रा. माहोरा, ता. जाफराबाद) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
४ नोव्हेंबर २०२१ रोजी किरकोळ वादावरून कलाबाई प्रभू लावाडकर यांच्या डोक्यात संशयित संजय मुळेकर याने खून केला होता. यात इतर तीन आरोपींनी मारहाण केली होती. या प्रकरणी प्रभू जगन लावाडकर यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. तर संजय मुळेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध पोलिस घेत होते. परंतु, मोबाईल नसल्याने त्याचा शोध लागत नव्हता.
दोन दिवसांपूर्वीच तो नातेवाईकांनी भेटण्यासाठी माहोरा येथे आला. याची माहिती जाफराबाद पोलिसांना कळाली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजाराम तडवी, पोउपनि. प्रल्हाद मदन, पोउपनि. तायडे, पोना. गणेश पायघन, पोकॉ. लक्ष्मण वाघ, पोहेकॉ. बावरे, पोहेकॉ. राजू डोईफोडे, संदीप गवई यांनी केली आहे.
मध्य प्रदेशात राहायचा संशयित
खून केल्यानंतर संजय मुळेकर हा फरार झाला होता. त्याची पत्नी व मुले माहोरा येथेच होती. तो मध्य प्रदेशमध्ये मोलमजुरी करून राहत होता. गत महिन्यात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तो येऊ शकला नाही. परंतु, काही दिवसांपूर्वीच तो माहोरा येते आला.