शिबिराने काँग्रेसमध्ये नवचैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:43 AM2018-02-21T00:43:37+5:302018-02-21T00:43:40+5:30
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास ज्येष्ठ आणि अनुभवी पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने काँग्रेस पक्षात चैतन्याचे वातावरण पसरले असून, कार्यकर्त्यांतही उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
जालना : कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास ज्येष्ठ आणि अनुभवी पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने काँग्रेस पक्षात चैतन्याचे वातावरण पसरले असून, कार्यकर्त्यांतही उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिल्या गेलेल्या बौद्धिकामुळे सरकारच्या विरोधाची धार तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षांत सत्ताबदलाने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत मरगळ आली होती. तुलनेने शिवसेनेची सत्तेत असूनही विरोधाची धार कायम होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल मोर्चा, बैलगाडी मोर्चा, ओबीसी मेळावा इ. द्वारे सरकारचे लक्ष वेधले. तुलनेत जिल्ह्यात काँग्रेस पक्ष गटतट आणि ज्येष्ठ-कनिष्ठतेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॅकफूटवर दिसून आला. त्यामुळे जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या पक्षाच्या भवितव्यासाठीही ही बाब गंभीर बनली होती. राजकारणात पक्षाचा दबदबा पूर्ववत व्हावा यासाठीच काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी पक्षाच्या पदाधिका-यांचे ‘गेट टूगेदर’ घेतले. यातून तुटलेली वा दुभंगलेली मने जुळविण्याचा प्रयोग झाला. याला ब-यापैकी यश आल्याचे दिसून आले. त्यानंतर पक्षातील जुने आणि नवे असा भेदाभेद दूर होण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्यस्तरीय नेत्यांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, विजय कामड, राजेंद्र राख, सत्संग मुंडे आदींच्या चर्चेतून प्रशिक्षण शिबीर घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार शिबिराची जय्यत तयार करण्यात आली. या शिबिरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, हर्षवर्धन पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, माजी मंत्री प्रा. वसंत पूरके आदी दिग्गज नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत आत्मविश्वास दुणावला. वैचारिक टॉनिक मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टिने काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. शिबिरास शहरासह जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ पदाधिका-यांनी लावलेल्या उपस्थितीवरुन आगामी काळात काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाले तर जिल्ह्यात आगामी दिवसांत राजकीय चित्र बदललेले दिसून येईल. आघाडी सरकारचे निर्णय आणि यामुळे सामान्य जनतेला झालेला फायदा हे काँग्रेस जनमानसात कितपत बिंबवण्यात यशस्वी होतो, यावरच पुढील निवडणुकांतील यशापयश अवलंबून राहणार असल्याचे दिसून येत आहे.
................................
जालना, परतूरकडे विशेष लक्ष....
जालना, परतूर आणि भोकरदन या विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस पक्षाची ताकद आहे. त्यातच जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकमार जेथलिया यांच्या परतूर आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विशेष लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तर भोकरदनमध्येही पक्षाची ताकद वाढविण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.
...........................................
परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान...
देशाप्रमाणेच जिल्ह्यालाही काँग्रेस पक्षाला उज्ज्वल परंपरा आहे. अनेक अभ्यासू आणि राजकारणी नेते या जिल्ह्याने दिले आहेत. मध्यंतरी ‘इगो’ प्रॉब्लेममुळे अनेक दिग्गज नेते पक्षापासून दुरावले होते. स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांतून पक्ष वाढविण्यासह जोडण्याचे काम सुरु आहे. सत्ताधा-यांविरोधात तयार होत असलेले वातावरण आणि शिबिरामुळे कार्यकर्त्यांना मिळालेली ऊर्जा यातून सत्ताबदलाचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. जिल्ह्यात काँग्रेसला असलेली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह पदाधिका-यांवर असणार आहे.
.........................
आघाडीने दोन्ही पक्षांची ताकद वाढणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरु झालेली आहे. याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनीही जालन्यात आले असता दुजोरा दिला आहे. आघाडीबाबत प्राथमिक चर्चाही झाल्याने राज्यात आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास मतविभाजन टळून अधिकाधिक उमेदवार निवडून येऊ शकणार आहेत.
...........................