जालन्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:41 AM2019-04-22T00:41:47+5:302019-04-22T00:42:24+5:30
जालना लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान होत आहे. या निमित्त राजकीय वातावरण बरेच तापले होते. परंतु प्रचाराच्या तोफा रविवारी सायं. ६ वाजता शांत झाल्या आहेत. असे असले तरी उमेदवार मात्र, प्रत्यक्ष गाठी-भेटीवर भर देऊन वैयक्तिक पातळीवर मतदान करण्याचे आवाहन करतानाचे दिसून आले.
जालना लोकसभा मतदार संघामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची राळ उठली होती. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा आणि कॉर्नर बैठका झाल्या. सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणावर यंदाची निवडणूक गाजली. एकूण २० उमेदवार असून, नोंदणीकृत पक्षाचे ९ तर ११ अपक्षांचा समावेश आहे.
मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंत
जालन्यात २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रारंभी सकाळी ६ वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्यात येणार आहे. सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार असून, ६ वाजेपर्यंत जे रांगेत असतील त्यांना टोकन देण्यात यईल.
मतदान कर्मचारी आज रवाना होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : २३ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व आवश्यक ते साहित्य घेऊन मतदान कर्मचारी त्या त्या मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळपासून रवाना होणार आहेत.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी रविवारी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, लोकसभा मतदार संघात जवळपास १८ लाख पेक्षा अधिक मतदार असून, सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपंग, अंध व्यक्तींसाठीही विशेष व्यवस्था केली असून, जवळपास १५० पेक्षा अधिक मतदान केंद्रांचे वेब कास्टींग करण्यात येणार आहे. इव्हीएम अथवा अन्य मशीन बंद पडल्यास ते तातडीने बदलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच आता शांततेत मतदान होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.