आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो दिसतो का? हाकेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:17 PM2024-09-19T16:17:21+5:302024-09-19T16:22:30+5:30
बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाकावे अशी जहरी टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली.
- पवन पवार
वडीगोद्री (जालना) : प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी, ९६ कुळ्यांची भाषा करायची आणि आम्ही मागास असल्याचं म्हणायचं. आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का? असा सवाल करत बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाकावे अशी जहरी टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली.
मनोज जरांगे शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून लोकप्रतिनिधींना शिव्या देतात. त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हाव यासाठी शुभेच्छा. तरी जस्टीस रोहिणी आयोगाच्या जजमेंटप्रमाणे जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकत नाही. तोपर्यंत जरांगेच काय, शरद पवार जरी आले तरी ओबीसीचे आरक्षण संपू शकत नाही. जरांगेंच्या सांगण्यावरून जीआर काढणार असाल तर ओबीसींचे सुद्धा जशासतसे उत्तर असेल, असा इशारा हाके यांनी सरकारला दिला. तसेच बिग बॉसच्या लोकांना माझी मागणी, जरांगेंना तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या, यापेक्षा जरांगेंची लायकी नाही, असा सणसणीत टोला हाके यांनी लगावला.
हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे. हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? जरांगे तमाशातला सोंगाड्या आहे, या माणसाच्या सांगण्यावरून जीआर काढण्याची तयारी करतात, याचे मुख्यमंत्री यांना काही वाटत नाही का? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण या माणसांना अंतरवली सराटीला जायला वेळ आहे आणि ओबीसीच्या एकही आंदोलकाकडे जायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका हाके यांनी केली.
जरांगे हे केवळ तमाशातला बताशा : नवनाथ वाघमारे
जरांगे हे केवळ तमाशातला बताशा, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं राज्यातील 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करू, SIT ची चौकशी केली नाही, मुख्यमंत्री मराठ्यांच्या हैदराबाद गॅझेट बाबत आम्ही सकारात्मक आहोत असं बोलत असतील तर नक्कीच आम्हाला आरक्षण वाचवण्यासाठी आमचा हक्क वाचवण्यासाठी आम्हाला जशास तसे उत्तर द्यावं लागेल. राज्यातल्या जातीवादी मुख्यमंत्र्याला जशास तसे उत्तरच कळत असेल तर उपोषणाचा उत्तर आम्ही उपोषणानेच देत आहोत. हैद्राबाद गॅझेट नावाचे एक नवीनच गाजर काढला असून ते गाजर जर लागू केलं तर ओबीसी समाजाचा नुकसान होईल, ते होऊ नये म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहोत,आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत राज्यसरकार सांगत नाही आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार नाही , सगे सोयरे कायदा करणार नाही असे सांगत नाही तोवर उपोषण सुरू राहणार आहे.