सीईओंकडून ‘त्या’ बदल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:16 AM2019-11-01T01:16:08+5:302019-11-01T01:16:15+5:30
सीईओंनी ६ जणांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी पदवीधर आणि मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यास नकार दिला होता. तरीही शिक्षण विभागाने चार पदवीधर व २ मुख्याध्यापकांच्या बदल्या केल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर सीईओंनी ६ जणांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हाभरातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यावेळी पदवीधर व मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यास सीईओंनी नकार दिला होता. असे असतानाही यातील ६ पदवीधर व मुख्याध्यापकांच्या बदल्या शिक्षण विभागाने केल्या.
शिक्षण विभागाने काही विस्थापित प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापक यांच्या पदस्थापना बदलून दिल्या होत्या. मात्र हे समुपदेशन सभागृहात न ठेवता चुकीच्या पध्दतीने संबंधिताच्या सोयीनुसार पदस्थापना दिल्या गेल्या. अर्थिक गैरव्यवहाराने या पदस्थापना बदलून दिल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदर सहा जणांच्या बदल्या रद्द केल्या आहे. दरम्यान, ही बाब शिक्षकांनी लक्षात आणून दिली. त्यानंतर मी लगेचच या बदल्या रद्द केल्या, असे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.
चौकशी करण्याची मागणी
काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने समुपदेशाने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यावेळी शिक्षण विभागाने चार पदवीधर व २ मुख्याध्यापकांच्या बदल्या केल्या. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या आदेशाला न जुमानता या बदल्या करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.